भोपाळ – मध्य प्रदेशच्या बांधवगड व्याघ्र प्रकल्पात काल चार हत्ती मृतावस्थेत आढळले. तर अन्य पाच हत्ती बेशुद्धावस्थेत आढळले.त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेने खळबळ माजली आहे. वन विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सालखनिया क्षेत्रात येणाऱ्या खिटौली आणि पतौर परिसरात ३८४ क्रमांकाच्या क्षेत्रात २ तर १८३-अ क्षेत्रामध्ये २ हत्ती काल सायंकाळी दैनंदिन गस्तीदरम्यान मृतावस्थेत आढळले.त्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबवली असता आणखी ५ हत्ती बेशुध्दावस्थेत आढळले. या कळपामध्ये एकूण ९ हत्ती होते. त्यापैकी चार हत्ती मरण पावले असून पाच हत्तींची प्रकृती गंभीर आहे.
बांधवगड अभयारण्यत अशा प्रकारची ही पहिलीच घटना असून यामागील नेमके कारण शोधण्यासाठी वन कर्मचाऱ्यांची पथके स्थापन करण्यात आली आहेत. संपूर्ण परिसरात शोध मोहीन राबवली जात आहे. या हत्तींनी शेतातील उभे पीक फस्त केले होते. या पिकावर फवारलेल्या रासायनिक किटकनाशकांमुळे हत्तींना विषबाधा झाली असावी,असे बोलले जात आहे.