मतदानामध्ये तफावत झाल्याचा मनसे उमेदवाराचा आरोप फेटाळला! राजेश येरुणकर यांना २ नव्हे ५३ मते मिळाली

मुंबई – दहिसर विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार राजेश येरुणकर यांनी ईव्हीएम वर संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या कुटुंबातील चार सदस्यांनी मतदान केलेल्या मतदान केंद्रावर त्यांना दोनच मते पडल्याचा दावा करत ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.मात्र पालिकेने त्यांचा हा आरोप फेटाळून लावला आहे. येरुणकर यांना २ नव्हे तर ५३ मते पडली असून त्यांच्या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

राजेश येरुणकर यांनी आपल्या घरातील पत्नी, मुलगी,आईचेही मत मिळाले नाही हे कसे होऊ शकते असे म्हणत ईव्हीएममध्ये फेरफार केला असल्याचा आरोप केला होता. मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा या दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारीपदाची जबाबदारी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे सोपवण्यात आली.त्यामुळे राजेश येरुणकर यांच्या या आरोपांना महापालिकेने उत्तर दिले आहे.राजेश येरुणकर यांच्या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचे पालिकेने म्हटले आहे. पालिकेने चार मुद्द्यांच्या आधारे येरुणकर यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.१७ सी फॉर्म आणि ईव्हीएम मशीन यामधील एकूण मतदानाची आकडेवारी तसेच मशीनचा क्रमांक तंतोतंत जुळत आहे.
त्यांना त्या मतदानकेंद्रावर ५३ मते मिळाली आहेत. मतमोजणी दिवशी कोणतीही लेखी तक्रार दहिसर विधानसभा मतदारसंघ येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झालेली नाही.

या मतदारसंघातून भाजपच्या मनिषा चौधरी ९८५८७ मते मिळवून विजयी झाल्या आहेत. दुसर्‍या क्रमांकावर विनोद घोसाळकर आहेत तर तिसर्‍या क्रमांकावरील मनसेचे राजेश येरुणकर यांना ५४५६ मते मिळाली आहेत. त्यामुळे येरुणकर यांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top