नागपूर – नागपूरमध्ये काल ईव्हीएम मशीन घेऊन जाणाऱ्या वाहनावर हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली. काल राज्यात विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रिया सायंकाळी ६ वाजता पूर्ण झाली. मतदानपूर्वी व मतदानानंतर हल्ले, दगडफेकीच्या घटनांचे चक्र सुरु होते. काल साडेसात वाजताच्या सुमारास मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रातील किल्ला परिसरातील बुथ क्रमांक २६८ येथून तवेरा एसयुव्ही गाडीतून निवडणूक कर्मचारी ईव्हीएम घेऊन जात होते. गाडी मतदान केंद्रातून बाहेर पडल्यानंतर, बूथ पासून काही अंतरावर कारवर लोखंडी रॉडने हल्ला झाला. या घटनेत कारची जबरदस्त तोडफोड झाली. याठिकाणी स्थानिक नागरिकांनी हस्तक्षेप करत पोलिसांना बोलावले.
पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होवून ईव्हीएम तसेच तवेरा एसयुव्हीमधील सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढले. तोडफोड झालेली तवेरा एसयुव्ही कार पोलिसांनी कोतवाली पोलीस ठाण्यात आणली. त्यानंतर ईव्हीएम आणि सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षितरित्या त्यांच्या निश्चित ठिकाणी पोहचवले. या घटनेनंतर कोतवाली पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्ते गोळा झाले होते. या हल्ल्यामागे काँग्रेस कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप भाजपा कार्यकर्त्यांनी केला आहे.