इंफाळ- मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला असून काल कांगपोकपी जिल्ह्यातील कंसाखुल आणि लीलोन वैफेई या दोन शेजारच्या गावांमध्ये झालेल्या हिंसाचारानतर संचारबंदी लागू करण्यात आली. या गावातील येण्याजाण्यावर पुढील आदेशापर्यंत बंदी घालण्यात आली आहे.
एका गावातील कुकी तरुणाने दुसऱ्या गावातील नागा महिलेवर हल्ला केल्याने येथे तणाव निर्माण झाला. त्याच वेळी, काल कामजोंग जिल्ह्यातील होंगबाई भागात, जमावाने आसाम रायफल्सच्या तात्पुरत्या कॅम्पवर हल्ला करून तो उद्ध्वस्त केले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सैनिकांनी घराच्या बांधकामासाठी लाकूड नेण्यापासून रोखल्याच्या रागातून त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. जमावाला पांगवण्यासाठी जवानांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि हवेत गोळीबार केला. कांगपोकपी जिल्ह्यात गेल्या एका आठवड्यापासून हिंसाचार सुरू आहे. काही दिवसांपूर्वी कुकी समुदायाच्या लोकांनी कांगपोकपी पोलीस अधीक्षक (एसपी) कार्यालयावर हल्ला केला होता. इंफाळच्या पूर्व जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सायबोल गावातून सुरक्षा दलांना हटवण्याची कुकी लोकांची मागणी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र अशी कोणतीही मागणी केली नसल्याचे कुकींनी म्हटले आहे. मणिपूरमध्ये शांतता नांदावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार! दोन गावांमध्ये संचारबंदी
