कडेगाव – मणिपूर राज्यातून उडालेल्या ससाण्याने ७,३०० किलोमीटरचा प्रवास केल्याची माहिती उघडकीस आली आहे. सॅटेलाईट टॅग लावलेला हा अमुर ससाणा या प्रवासात सांगलीत थांबला. नतर तिथून उडून त्याने गुहागरमधील गोपाळगडावरून अरबी समुद्रात प्रवेश केला. त्यानंतर त्याने केनियापर्यंतचा प्रवास पूर्ण केला. १३ ते २७ नोव्हेंबर या १३ दिवसांच्या कालावधीत त्याने हा प्रवास केला आहे,अशी माहिती भारतीय वन्यजीव संस्थानचे शास्त्रज्ञ डॉ.आर.सुरेशकुमार यांनी दिली आहे.
दरवर्षी उत्तर चीनमध्ये प्रजनन करणारे हे पक्षी हिवाळ्यात दक्षिण आफ्रिकेत स्थलांतरित होतो.स्थलांतरादरम्यान तो भारत, श्रीलंका,चीन आदी आशियाई देशावरून प्रवास करतो. ते भारतातील नागालँड आणि मणिपूर या राज्यांमध्ये थांबून विश्रांती घेतात. डॉ.आर.सुरेशकुमार यांनी स्थलांतर करणार्या दोन अमुर ससाणा (फालको अमूरॅनसिस) पक्ष्यांना टॅग लावले होते. टॅग लावलेला एक पक्षी १६ नोव्हेंबर रोजी कडेगाव शहराजवळच्या माळरानावर मुक्कामी थांबल्याची नोंद आहे. दुसऱ्या पक्ष्याने त्याच प्रदेशातून कोल्हापूरकडून प्रवास केल्याची नोंद आहे.