मढ-मार्वे येथील एक हजार कोटींच्या
स्टुडिओंवर मुंबई पालिकेचा हातोडा

मुंबई – भाजपचे नेते किरीट सोमय्यांच्या आरोपांचे रुपांतर अखेर कारवाईत झाले. मुंबई मढ येथील अनधिकृत स्टुडिओ पाडण्यासाठी मुंबई महापालिकेकडून कडक कारवाई करण्यात आली. किरीट सोमय्या आज सकाळीच प्रतिकात्मक हातोडा आणि फावडा घेऊन मढ येथे निघाले होते. मुंबईच्या मढ परिसरातील अनधिकृत फिल्म स्टुडिओ पाडण्याचे काम आज सुरू करण्यात आले.
एक हजार कोटी रुपयांचे स्टुडिओ बेकायदेशीर असल्याचा निर्णय राष्ट्रीय हरित लवादाने गुरुवारी दिला. आम्ही फक्त तात्पुरते बांधकाम करण्यास परवानगी दिली होती. मात्र, त्याजागी कायमस्वरूपी स्टुडिओ उभारण्यात आले, असे हरित लवादाने निर्णयात स्पष्ट केले. स्टुडिओ पाडतानाचे काम सुरू असताना सोमय्याही या ठिकाणी पोहोचले. मुंबईचे माजी पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई उपनगरचे माजी पालकमंत्री अस्लम शेख यांच्या आशीर्वादानेच डझनभर अनधिकृत स्टुडिओ उभारण्यात आले, असा

आरोप सोमय्यांनी केला. ते पुढे म्हणाले, आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांनी या बांधकामाला परवानगी दिली होती. स्टुडिओ मालकाने न्यायालयात याचिका रद्द करण्याची मागणी केली. राजकारण बाहेर करा, असे याचिकाकर्त्यांना न्यायालयाने सुनावले. मुंबई महानगरपालिकेच्या आशीर्वादाने या बेकायदेशीर स्टुडिओला परवानगी मिळाली होती. त्यांची चौकशी झालीच पाहिजे. आदित्य ठाकरे, अस्लम शेख यांच्या भ्रष्टाचाराचे स्मारक उद्ध्वस्त झाले आहे. आदित्य ठाकरेंच्या पर्यावरण मंत्रालयाने या स्टुडिओंच्या बांधकामाला परवानगी दिली. मी केंद्र सरकारकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी विचारले कोणत्या नियमांतर्गत परवानगी दिली.
22 फेब्रुवारी 2021 रोजी पर्यावरण मंत्रालयाने परवानगी दिली. ती बेकायदेशीर होती. परवानगी 6 महिन्यांसाठी होती आणि त्याला 19 महिने झाले आहेत. स्टुडिओ समुद्रात बांधले आहेत, त्यामुळे हे तर तुटणारच, असेही सोमय्या म्हणाले.

प्रतिकात्मक कुदळ आणि फावडा घेऊन किरीट सोमय्या पाडकामाच्या ठिकाणी

महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान किरीट सोमय्या मढ येथे उपस्थित होते. यावेळी त्यांच्या हातात प्रतिकात्मक हातोडा आणि फावडा होता. यावर महापालिका कारवाई करत असताना तिथे सोमय्यांनी जायलाच हवे का, हातात प्रतिकात्मक हातोडा घेऊन जाण्याची काय गरज, असे प्रश्न अनेकांनी उपस्थित केले. तसेच हातात हातोडा घेऊन आला ‘मुंबईचा थॉर’ (इंग्रजी चित्रपटातील एक व्यक्तिरेखा), अशी प्रतिक्रिया नेटकर्‍यांनी त्यांच्या फोटोवर दिली.

Scroll to Top