वॉशिंग्टन – इंटरनेटवरील जगभरातील अव्वल क्रमांकाचे सर्च इंजिन असलेल्या गुगलची चोरी न्यायालयाने पकडली आहे. गुगलने स्वतःला डिफॉल्ट सर्च इंजिन बनवण्यासाठी, स्वतःची मक्तेदारी निर्माण करण्यासाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी बेकायदेशीरपणे अनेक मार्गांचा अवलंब केला. अब्जावधी डॉलर खर्च केला,असा ठपका ठेवत अमेरिकेतील जिल्हा न्यायालयाने गुगलला मोठा दणका दिला.न्यायालयाच्या या निर्णयामुळे गुगलविरोधात दुसरा खटला दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुगलची पितृकंपनी अल्फाबेट गुगलपासून वेगळी होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास गेल्या अनेक वर्षांपासून गुगलचे वर्चस्व असलेल्या ऑनलाईन जाहिरातींच्या क्षेत्रात मोठा बदल दिसून येईल. गेल्या वर्षी अल्फाबेटच्या ऑनलाईन जाहिरातींच्या एकूण उत्पन्नात गुगलचा वाटा ७७ टक्के होता.गुगलचे बिंग फोडणारा हा निर्णय वॉशिंग्टन डी सी जिल्हा न्यायाधीश अमित मेहता यांनी दिला आहे. गुगल ऑनलाईन सर्चवर ९० टक्के तर स्मार्टफोनवर ९५ टक्के नियंत्रण ठेवते.कंपनीने आपले सर्च इंजिन स्मार्टफोन आणि ब्राउझरवर डिफॉल्ट ऑफर केले जावे यासाठी सन २०२१ मध्ये २६.३ अब्ज डॉलर खर्च केले होते.जिल्हा न्यायालयाच्या या निर्णयाचा गुगल मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. गुगलने या निर्णयाच्या विरोधात वरच्या न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे.दुसरीकडे अमेरिकेचे अटर्नी जनरल मेरीक गारलँड यांनी हा निर्णय इंटरनेट वापरर्त्यांसाठी ऐतिहासिक विजय असल्याचे म्हटले आहे.कंपनी कितीही मोठी किंवा प्रभावशाली असली तरी ती कायद्याहून मोठी असू शकत नाही,अशी प्रतिक्रिया गारलँड यांनी न्यायालयाच्या निकालावर दिली.
मक्तेदारी टिकवण्यासाठी गैरमार्गांचा वापर गुगलला अमेरिकन न्यायालयाचा दणका
