वॉशिंग्टन – ‘नासा’चे अनेक रोव्हर्स म्हणजेच यांत्रिक बग्ग्या सध्या मंगळावर संशोधनासाठी फिरत आहेत. त्यामध्ये ‘क्युरिऑसिटी’ नामक रोव्हरचाही समावेश आहे. या रोव्हरने अलीकडेच मंगळावरील एक दगड चुकून फोडला. त्यावेळी त्याच्यात पिवळा घटक दिसून आला. हा पिवळा पदार्थ म्हणजे सल्फरचे क्रिस्टल्स म्हणजे गंधकाचे स्फटिक आहेत.
वास्तविक मंगळावर सल्फेट आढळणे ही एक सर्वसामान्य बाब आहे. मात्र, आता प्रथमच या लाल ग्रहावर सल्फर शुद्ध स्वरूपात आढळला आहे. ‘क्युरिऑसिटी रोव्हर’ म्हणजे मंगळावरील एक चालतीफिरती प्रयोगशाळा आहे. ८९९ किलो वजनाचे हे रोव्हर जेव्हा मंगळावर फिरते त्यावेळी त्याच्या खाली दगड-माती दबली जाते. मे महिन्यात हे रोव्हर असेच फिरत असताना त्याच्या चाकाखाली येऊन एक दगड तुटला. मंगळावरील गेडिज वालिस चॅनेल असे नाव दिलेल्या ठिकाणी अशा स्वरूपाचे अनेक दगड आहेत. तुटलेल्या दगडात हे गंधकाचे स्फटिक असल्याचे दिसत आहे. या शोधामुळे मंगळावर काही ठिकाणी सल्फर आपल्या शुद्ध स्वरूपात आणि मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहे, याचे संकेत मिळत आहेत.