भोपाळ – मध्य प्रदेशाची राजधानी असलेल्या भोपाळ शहरातील वनविहार प्राणीसंग्रहायालयाला गुजरातमधून दोन आशियाई सिंह मिळणार आहेत. गुजरातने हे सिंह देण्यास संमती दिली असून राष्ट्रीय प्राणिसंग्रहालय प्रधिकरणाची मंजुरी मिळाल्यानंतर ही हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.गुजरातमधील सक्करबाग प्राणिसंग्रहालयातून हे सिंह येणार असून गुजरातचे पर्यावरण शिक्षण व संशोधन प्राधिकरण ही सर्व प्रक्रीया पूर्ण करणार आहे. वनविहार प्राणिसंग्रहालय या सिंहांच्या बदल्यात गुजरातला दोन वाघ देणार आहे. येत्या काही दिवसांत वनविहारच्या अधिकाऱ्यांचे पथक गुजरातला जाणार असून त्यावेळी ते या सिंहांच्या आरोग्याची व इतर बाबींची तपासणी करेल. गुजरातच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वीच मध्यप्रदेशात येऊन या सिंहांसाठीच्या प्रस्तावित जागेची पाहणी केली आहे. राज्यांतर्गत प्राणी हस्तांतरण कार्यक्रमानुसार या वाघ व सिंहांचे हस्तांतरण होणार असून हे सिंह वनविहार प्राणिसंग्रहालयाचे मुख्य आकर्षण ठरतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
भोपाळच्या वनविहार प्राणीसंग्रहायाला गुजरातकडून अशियाई सिंह मिळणार
