श्रीनगर – उधमपूरमधील राष्ट्रीय महामार्ग-४४ वर दरड कोसळल्याने जम्मू-श्रीनगर महामार्गावर वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली होती. अखेर ३८ तास बंद राहिल्यानंतर बुधवारी रामबन जिल्ह्यातील शेरबीबी येथे २४७ किमी लांबीच्या जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अंशतः सुरू करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शेरबीबी येथे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाल्यामुळे सोमवारपासून जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी ट्रक आणि इतर वाहने अडकून पडली होती. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून शेरबीबीजवळील दरड हटवल्यानंतर रामबन जिल्ह्यातील हायवेच्या शेरबीबी मार्गावर वाहतूक काही प्रमाणात पूर्ववत झाली आहे. ढिगारा साफ केल्यानंतर, अडकलेली वाहने काढली जात आहेत. वाहनचालकांना ओव्हरटेक न करण्याचा आणि लेनची शिस्त पाळण्याचा सल्ला दिला जात आहे. शालगडीजवळ राष्ट्रीय महामार्ग-४४ दोन मृतदेह ३० तासांहून अधिक काळ हलवता आले नव्हते. स्वयंसेवकांनी ते अखेर बनिहालच्या दिशेने श्रीनगरला पाठवले.
या महामार्गावर अजूनही येथे काम सुरू असून, जिल्हा प्रशासनाने अनेक प्रवाशांना रामसू, बनिहाल आणि रामबन येथील कम्युनिटी हॉलमध्ये हलवले. तिथे त्यांना चहा आणि ब्लँकेट देण्यात आल्याचे रामबनचे उप दंडाधिकारी मुसरत इस्लाम यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर लिहिले. तसेच महामार्ग बंद झाल्यामुळे अडकलेल्या ट्रकसह सुमारे ५०० वाहने श्रीनगरला हलवण्यात आल्याचे रामबन एसएसपी मोहिता शर्मा यांनी सांगितले