नवी दिल्ली – भूषण पॉवर अँड स्टील या दिवाळखोरीत निघालेल्या कंपनीची जेएसडब्ल्यू स्टील कंपनीने लिलावात विकत घेतलेली मालमत्ता अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) जेएसडब्ल्यू कंपनीला परत केली आहे. जेएसडब्ल्यू स्टील कंपनीविरोधात केलेली याचिका मागे घेत असल्याचे ईडीने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. त्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशाने ईडीने भूषण स्टील कंपनीची ४ हजार २५ कोटी रुपयांची जप्त केलेली मालमत्ता जेएसडब्ल्यू कंपनीला परत केली आहे.
डिसेंबर २०१९ पासून लागू झालेल्या भारतीय दिवाळखोरी संहितेच्या कलम ३२ अ अन्वये भूषण स्टील कंपनीची ४ हजार २५ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली होती. भूषण स्टील कंपनीच्या गुंतवणूकदारांच्या हिताच्या रक्षणासाठी ईडीने ही जप्तीची कारवाई केली होती.
मात्र या प्रकरणातील मुद्यांचा बारकाईने विचार केल्यानंतर ईडीने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करून जेएसडब्ल्यू स्टील कंपनीला भूषण स्टील कंपनीची विकत घेतलेली मालमत्ता मुक्त करण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने ही मालमत्ता जेएसडब्ल्यू कंपनीला परत करण्यात आली आहे.