मुंबई- मुंबईतील मनोरंजन मैदाने व क्रीडांगणे दत्तक तत्त्वावर देण्याबाबत मुंबई महापालिकेने तयार केलेल्या प्रारूप प्रस्तावित धोरणाला सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. पालिकेने हे भूखंड आपल्याच ताब्यात ठेवून त्याची पालिकेनेच देखरेख करावी, यासाठी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची भेट घेतली जाणार आहे. या धोरणाला सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे.
मुंबईतील मनोरंजन मैदाने व क्रीडांगणे दत्तक तत्त्वावर देण्याबाबत मुंबई महानगरपालिकेने प्रारूप प्रस्तावित धोरण तयार केले आहे. हे धोरण महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या धोरणाच्या मसुद्यावर नागरिक व संस्थांनी १० ऑक्टोबरपर्यंत सूचना व हरकती पाठवाव्यात, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. त्यामुळे या धोरणाबाबत सध्या चर्चा सुरू आहे. या मसुद्याबाबत रविवारी मुंबईतील सामाजिक कार्यकर्त्यांनी माजी केंद्रीय माहिती आयुक्त शैलेश गांधी यांच्या सांताक्रूझ निवासस्थानी एक बैठक घेतली. या बैठकीत नव्या मसुद्याचा विरोध करण्यात आला. पालिकेने भूखंड आपल्याच ताब्यात ठेवून त्याची देखरेख स्वत: करावी, अशी भूमिका ठरवण्यात आली. यापूर्वी मुंबईमधील मोकळे भूखंड राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि त्यांच्या संस्थांनी लाटले होते. हा वाईट अनुभव गाठीशी असतानाही पुन्हा पालिका भूखंड दत्तक घेण्यासाठी हे धोरण का तयार करते, असा सवाल शैलेश यांनी उपस्थित केला. या धोरणामागचे कारण या मसुद्यात दिलेले नाही, असा आक्षेपही कार्यकर्त्यांनी घेतला.
भूखंड दत्तक तत्वावर देण्यास सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध
