मुंबई- भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने काल शुक्रवारी सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, रोना विल्सन, सुधीर ढवळे आणि शोमा सेन या पाच आरोपींना जामीन देण्यास नकार दिला.विशेष न्यायालयाच्या २०२२ च्या आदेशांविरुद्ध दाखल केलेल्या याचिकांवर उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. न्यायमूर्ती एएस गडकरी आणि श्याम सी चंडक यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.
या पाच आरोपींना यूएपीए
कायद्याअंतर्गत जून २०१८ मध्ये अटक केली होती.महेश राऊत यांना गेल्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला होता. मात्र,एनआयएने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करण्यासाठी वेळ मागितल्यानंतर उच्च न्यायालयाने आपल्या आदेशाला आठवडाभरासाठी स्थगिती दिली होती. यानंतर एनआयएने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले.त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने नियमित जामिनावर बंदी घातली.
त्याचवेळी नागपूर विद्यापीठाच्या प्राध्यापिका शोमा सेन यांना ५ एप्रिल २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला. नागपूर विद्यापीठाचे प्राध्यापक सुधीर ढवळे,संशोधक रोना विल्सन आणि अधिवक्ता सुरेंद्र गडलिंग आणि महेश राऊत हे अजूनही कोठडीत आहेत.यापूर्वी डिसेंबर २०२१ मध्ये न्यायमूर्ती संभाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने गडलिंग यांना डिफॉल्ट जामीन देण्यास नकार दिला होता.