भिवंडी – १९७२ साली उभारलेल्या भिवंडी आगारातील एसटी स्थानकाची दयनीय अवस्था झाली आहे. या स्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य आहे. पावसाळ्यात येथे गळती ठरलेलीच आहे. इमारतीच्या खिडक्याही तुटलेल्या अवस्थेत आहेत. या स्थानकातील खड्डे भरण्याचे काम करून डागडुजी करण्याएवजी हे स्थानक नव्याने उभारावे, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
सध्या या एसटी स्थानक आवारात खड्डे भरण्याचे काम सुरू झाले आहे. पावसाळा संपून तीन महिन्यानंतर हे काम सुरू झाले आहे. पण पावसाळ्यात याकडे दुर्लक्ष केले गेले. या बसस्थानक इमारतीला ५२ वर्षे पूर्ण झाली आहेत. वेळीच दुरुस्त न झाल्याने इमारतीच्या काही खिडक्या तुटल्या आहेत.तर काही ठिकाणी प्लॅस्टर निघालेले आहे.नागरिकांना रांगेत उभे राहण्यासाठी असलेल्या ठाणे-कल्याणच्या फलाटाचे लोखंडी पाईप तुटले असून तिथे कोणीही रांग लावत नाही.अनेकवेळा या इमारतीबाहेर प्रवाशांना उन्हात पावसात उभे राहावे लागते.स्थानकाच्या कॅन्टीनमध्येदेखील प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध नाहीत.त्याचप्रमाणे शौचालयाचीदेखील दुरवस्था झाली असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.