भिवंडी – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी पश्चिममधील प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत.लोकसभेच्या निवडणुकीत भिवंडीतील काही मतदान केंद्रावर गोंधळ निर्माण झाला होता . त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.त्याचे लाइव्ह वेब कास्टिंग होणार असल्याची माहिती भिवंडी पश्चिमचे निवडणूक निर्णय अधिकारी उदय किसवे यांनी दिली.
निर्णय अधिकारी उदय किसवे यांनी सांगितले की, भिवंडी पश्चिममध्ये एकूण मतदान केंद्रे ३०३ आहेत. त्यापैकी ४३ मतदान केंद्रे ग्रामीण परिसरात आहेत.ही मतदान केंद्रे बंदिस्त ठिकाणी असणार आहेत. मागील निवडणुकीत मंडपात एकूण ५८ मतदान केंद्र होती.त्यापैकी १६ मतदान केंद्रांची सोय बंदिस्त ठिकाणी झाल्याने आता मंडपातील मतदानाची संख्या ४२ झाली आहे. भिवंडी पश्चिम मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्राच्या आत आणि बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे मतदान केंद्रावर होमगार्डऐवजी पोलिसांची नियुक्ती केला जाणार आहे.अशाप्रकारे मतदान केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यास बोगस मतदारांचे प्रमाण देखील कमी होणार आहे.