ठाणे – भिवंडी शहरातील बालाजीनगर परिसरातून दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. या बेपत्ता मुलांचे मृतदेह बुधवारी सकाळी खदाणी जवळच्या एका तलावात आढळून आले. या घटनेमुळे येथील परिसरात एकच खळबळ उडाली. सत्यम पन्नीलाल चौरसिया (९) आणि शुभम जितेंद्र चौरसिया (१४) अशी या दोन मुलांची नावे आहेत.
हे दोघेजण मंगळवार दुपारपासून बेपत्ता होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम हा बालाजी परिसरातल्या भंडारी कंपाउंडमधील इमारतीत राहत होता. सत्यम हा त्याच्या शेजारील इमारतीमध्ये राहत होता. हे दोघे मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास भंडारी कंपाउंडमधील ग्लोबल हॉस्पिटलसमोरील सिद्दीकी सेठ या पडलेल्या इमारतीच्या मैदानात खेळण्यासाठी गेले होते. मात्र, बराच वेळ होऊनही दोघेही घरी परत न आल्याने त्यांच्या पालकांच्या तक्रारीवरून भोईवाडा पोलीस ठाण्यात मुलांच्या अपहरणाची नोंद करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करून मुलांचा शोध सुरू केला.
बुधवारी सकाळच्या सुमारास रेल्वे स्थानक परिसरातील खदाणी लगतच्या तलावात दोन मुलांचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. तपासादरम्यान ही मुले सत्यम आणि शुभम असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.