मुंबई- भाजपाकडून संविधान व संविधान निर्मात्याचा सातत्याने अवमान केला जात असल्याचा आरोप करत काँग्रेसने घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राज्यघटना यांचा सन्मान, सामाजिक न्याय व समानतेच्या मुल्यांचे रक्षणासाठी ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ हे देशव्यापी अभियान सुरू केले आहे. या अभियानाचा पुढचा टप्पा म्हणून आता 26 जानेवारी 2025 ते 26 जानेवारी 2026 या वर्षभराच्या कालावधीत ‘संविधान वाचवा राष्ट्रीय पदयात्रा’ ही देशव्यापी मोहीम काँग्रेसकडून राबवण्यात येणार आहे. ‘भारत जोडो’ यात्रेप्रमाणे या यात्रेला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा काँग्रेसला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत भाषण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झाल्याचे सांगत काँग्रेसने अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या मुद्यावरून अमित शहा आणि भाजपाचा निषेध म्हणून देशव्यापी संविधान सन्मान मोहीम राबवण्याचाही निर्णय घेतला होता. त्यानुसार गेल्या वर्षी 26 डिसेंबर रोजी बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ हे अभियान राबवण्यात येणार होते. परंतु माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाल्याने हे अभियान स्थगित झाले होते. ते 3 जानेवारीपासून सुरू करण्यात आले असून, 26 जानेवारी रोजी मध्य प्रदेशातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव
असलेल्या महू येथे त्याची सांगता होणार आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान यांचा सन्मान, सामाजिक न्याय व समानतेच्या मुल्यांचे रक्षणासाठी करण्यासाठी काँग्रेस पक्ष कटीबद्ध आहे. याच हेतूने काँग्रेस पक्षाने ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ हे अभियान आयोजित केले आहे. देशपातळीवर 3 जानेवारीपासून हे अभियान सुरू झाले असून 26 जानेवारी रोजी महूच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे सांगता होणार आहे. या निमित्ताने महूमध्ये भव्य रॅलीने होणार आहे.
26 जानेवारी रोजी राज्यघटनेचा 75 वा वर्धापनदिन असल्याने राज्य, जिल्हा व ब्लॉक स्तरावर रॅलीचे ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ आयोजन करण्यात आले आहे. हे अभियान अधिक मजबूत करण्यासाठी 26 जानेवारी 2025 ते 26 जानेवारी 2026 या दरम्यान ‘संविधान वाचवा राष्ट्रीय पदयात्रा’ ही देशव्यापी जनसंपर्क मोहीम राबवली जाणार आहे. या अभियानात प्रदेश काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, आजी माजी आमदार, खासदार व विभागाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, भारत जोडो यात्रेने काँग्रेसला संजीवनी दिली. काँग्रेसच्या राजकारणात हे एक महत्त्वाचे वळण ठरले. आम्ही भारत जोडो न्याय यात्राही काढली. आता 26 जानेवारीपासून आम्ही एक वर्षाची ‘संविधान वाचवा राष्ट्रीय पद यात्रा’ सुरू करणार आहोत.
हत्येच्या तपासासाठी नवी एसआयटी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासासाठी सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीमधील काही पोलीस अधिकाऱ्यांवर देशमुख कुटुंबाने संशय व्यक्त केला होता. त्यामुळे आता सरकारने 7 सदस्यांची नवी एसआयटी स्थापन केली आहे. पोलीस महानिरीक्षक बसवराज तेली हेच या एसआयटीचे प्रमुख असतील. नव्या एसआयटीत अनिल गुजर, किरण पाटील, सुभाष मुठे, अक्षयकुमार ठीकने, शर्मिला साळुंखे आणि दीपाली पवार यांचा समावेश आहे.
‘भारत जोडो’नंतर ‘संविधान वाचवा! ‘काँग्रेसची वर्षभर देशव्यापी पदयात्रा
