नवी दिल्ली – कॅनडाने भारतासोबतची व्यापार चर्चा स्थगित केली आहे. भारत आणि कॅनडा यांच्यातील मुक्त व्यापार करारावर (एफटीए) १० वर्षांनंतर पुन्हा सुरू झालेल्या वाटाघाटी खलिस्तानच्या मुद्दयावरून थांबल्या आहेत. पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान निर्माण करण्याच्या मागणीला पाठिंबा देणाऱ्या अनेक शिखांना कॅनडाने थारा दिला आहे.
शीख फॉर जस्टिस या फुटीरतावादी गटाने १० सप्टेंबर रोजी कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया येथील गुरुद्वारात खलिस्तानबद्दल सार्वमत घेतले. तसेच ८ जुलै रोजी खलिस्तानी समर्थकांनी कॅनडात रॅलीही आयोजित केली होती. गेल्या काही वर्षांत कॅनडातील अशा प्रकारच्या घटना वाढत आहेत. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्या भेटीत नाराजी व्यक्त केली होती. मात्र, कॅनडा नेहमीच अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि शांततापूर्ण निषेधाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करेल, असे ट्रुडो यांनी म्हटले होते. या सर्व घटनाक्रमानंतर दोन्ही देशांत सुरू असलेल्या मुक्त व्यापार करारासंबंधी वाटाघाटी थांबल्या आहेत. व्यापार करारावर दोन्ही देशांदरम्यान आतापर्यंत सहाहून अधिक फेऱ्या झाल्या आहेत. या प्रकारच्या करारांमध्ये दोन देश त्यांच्यामध्ये व्यापार केलेल्या जास्तीत जास्त वस्तूंवरील शुल्क लक्षणीयरीत्या कमी करतात किंवा रद्द करतात.
भारत-कॅनडा यांच्यातील व्यापार करार चर्चा स्थगित
