नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनानिमित्त सध्या भारत दौऱ्यावर आलेले इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उभय देशांदरम्यान विविध क्षेत्रांतील सहकार्य करारांना मंजुरी देण्यात आली. त्यात समुद्री सुरक्षा, सायबर सुरक्षा, दहशतवाद विरोध या क्षेत्रांचा समावेश आहे.संरक्षण क्षेत्रांतही दोन्ही देशांनी सह्कार्याचे धोरण राबवण्यात येणार असून निर्मिती आणि पुरवठ्यावर भर दिला जाणार आहे.सुबियांतो हे भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित आहेत. ते गुरुवारी रात्री भारतात दाखल झाले.प्रजासत्ताक दिनी उपस्थित राहणारे सुवियांतो हे इंडोनेशियाचे चौथे राष्ट्राध्यक्ष आहेत. विमानतळावर त्यांचे स्वागत परराष्ट्र राज्यमंत्री पावित्रा मार्गारिटा यांनी केले. सुवियांतो यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.
पंतप्रधान मोदी आणि सुबियांतो यांच्या उपस्थितीत दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये उभय देशांदरम्यान विविध क्षेत्रांतील सहकार्य करार करण्यात आले.याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याला इंडोनेशियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आता भारताच्या अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनी इंडोनेशिया पुन्हा एकदा ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार ठरला आहे. दोन्ही देशांतील व्यापार वाढत असून गेल्या वर्षी तो ३० अब्ज डॉलर्स इतका होता.