न्यूयॉर्क- अमेरिकेत स्थलांतरित झालेले भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक कमाईत अव्वल आहेत. चीन, तैवान आणि जपानी वंशाच्या आणि श्वेतवर्णीय अमेरिकी नागरिकांना भारतीयांनी कमाईत मागे टाकले आहे, असे निरीक्षण टेस्ला आणि स्पेसएक्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांनी नोंदविले आहे.
एलॉन मस्क यांनी त्यांच्या मालकीच्या ‘एक्स’ या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. अमेरिका ही संधीची खाण आहे,अशी स्तुती त्यांनी केली आहे.अमेरिकेच्या जनगणना विभागाच्या २०१८ मधील माहितीचा आधार घेत त्यांनी विविध देशांतून अमेरिकेत स्थलांतर झालेल्या नागरिकांच्या सरासरी कौटुंबिक उत्पन्नाची आकडेवारी दिली आहे. मस्क हे स्वतः दक्षिण आफ्रिकेतून अमेरिकेत स्थलांतरित झालेले आहेत. जात आणि लिंगनिहाय उत्पन्न असामनतेवर होणाऱ्या वादाचे त्यांनी खंडन केले आहे.’ द रॅबिट होल’ या नावाच्या ‘एक्स’च्या वापरकर्त्याच्या मूळ पोस्टमध्ये ‘मेडियन यूएस हाउसहोल्ड इन्कम बाय सिलेक्टेड एथनिक ग्रुप्स २०१८’ या शीर्षकाने जनगणना अहवालातील माहितीचा उल्लेख मस्क यांनी केला आहे. आशियाई महिला अमेरिकेतील गोऱ्या पुरुषांपेक्षा जास्त कमावतात,हे दाखविणारी आकडेवारी मस्क यांनी त्यांच्या हँडलवरून पुन्हा शेअर केली . याची मूळ पोस्ट आता ‘एक्स’वरून गायब झाली आहे.