वाशिंगटन- अमेरिकेच्या इंडियाना प्रांतात भारतीय वंशाच्या तरुणाची गोळी झाडून हत्या केली. गेविन दसौर (वय २९) आपल्या पत्नीसह घरी जात असताना ही घटना घडली. दसौर याचा २९ जून रोजी विवियाना झमोरा हिच्याशी लग्न झाले होते. लग्नाच्या दोन आठवड्यातच त्याचा मृत्यू झाला. दसौर हा उत्तर प्रदेशच्या आग्रा येथील रहिवासी आहे.
गेविन हा अमेरिकेत ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करत होता. १६ जुलै रोजी संध्याकाळी गेविन आणि त्याची पत्नी आणि बहीण दीपशी एका मॉलमध्ये गेले होते. घरी परतत असताना एका पिकअप ट्रकने त्यांना धडक दिली, त्यामुळे त्याची गाडी रस्त्यावरून खाली उतरली. गेविनने ट्रकचा पाठलाग करून त्याला थांबवले, पण चालकाने गेविनची हसून थट्टा केली आणि पिकअप चालकाने अचानक गेविनवर तीन गोळ्या झाडल्या.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन त्या ट्रकचालकाला घटनास्थळावरून ताब्यात घेतले. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक चौकशी केल्यानंतर आरोपीला जामिनावर मुक्त केले. कारण त्याने स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. मात्र गेविन याच्या पत्नीने या जामिनाचा विरोध केला आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.