ब्राझिलिया – भारतातील आंध्र प्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यातील गायींना देश-विदेशात मोठी लोकप्रियता आहे. देशी गायींचा वंश दूरवर ब्राझीलमध्येही वाढत आहे आणि तिथे नावलौकिकही कमावत आहे.ब्राझीलमधील मिनास गेराईस येथे झालेल्या लिलावात एका नेल्लोर गायीला तब्बल ४० कोटी रुपयांची आश्चर्यचकित करणारी किंमत मिळाली आहे.
भारतीय गायींच्या वंशातील नेल्लोर प्रजातीमधील ही गाय आहे.’वियाटिना-१९’ या गायीचे वजन ११०१ किलो आहे, जे इतर नेल्लोर गायींच्या तुलनेत दुप्पट आहे.’वियाटिना-१९’ने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.’वियाटिना-१९’ ही एक असामान्य गाय आहे.दुर्मिळ जेनेटिक्स आणि शरीर वैशिष्ट्यामुळे या गायीने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.प्रतिष्ठित अशा चॅम्पियन ऑफ द वर्ल्ड स्पर्धेत या गायीला ‘मिस साऊथ अमेरिकेचा’ किताब मिळाला होता.नेल्लोर हा गायीचा प्रकार भारतात ओंगोल म्हणूनही ओळखला जातो.आंध्र प्रदेशातील ओंगोल प्रदेशातील या गायी अति उष्णतेचा सामना करण्याच्या क्षमतेसाठी ओळखल्या जातात.या गायींची रोगप्रतिकारशक्तीही उत्तम असते.कमीत कमी देखभाल खर्च यासोबत वेगळ्या वातावरणात तग धरून राहण्याची या गोवंश प्रकाराची क्षमता ‘वियाटिना-१९’ला वैशिष्ट्यपूर्ण बनवते.या गायीच्या शारीरिक रचनेमुळे ती अधिक आकर्षक दिसते. पांढरा रंग,पाठीवरील कुबड आणि सैल त्वचा यामुळे गाय सुंदर दिसते. सैल त्वचा ही उष्णतेला कमी करण्यास मदत करते, तर कुबड चरबी जमा करते. त्यामुळे गाय पुरेसे अन्न न मिळाले तरी स्वतःचे आरोग्य सांभाळू शकते.