नवी दिल्ली -क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघावरील बंदी उठवली आहे. त्यामुळे भारतीय कुस्ती महासंघाला मोठा दिलासा मिळाला आहे. २४ डिसेंबर २०२३ रोजी क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघाचे निलंबन केले होते. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण सिंह यांचे नीकटवर्तीय संजय सिंह यांच्याकडेच महासंघाची सूत्रे सोपवली आहेत.
महिला कुस्तीगीरांनी केलेल्या आरोपानंतर ब्रजभूषण सिंह यांनी कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंत संजय सिंह यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने २१ डिसेंबर २०२३ रोजी निवडणुका जिंकल्या होत्या. परंतु त्यांनी निवडून आल्यावर उत्तर प्रदेशातील गोंडा येथे १५ वर्षांखालील आणि २० वर्षांखालील राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेची घाईघाईने घोषणा केली होती. गोंडा हा ब्रजभूषण सिंह यांचा बालेकिल्ला समजला जातोय या स्पर्धेला साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजंरग पुनिया यांनी विरोध केला होता. त्यानंतर क्रीडा मंत्रालयाने क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाच्या कार्यकारी समितीला क्रीडा संहितेचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून निलंबित केले होते.
कुस्तीची जागतिक संस्था युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने गेल्या वर्षी संजय सिंग यांच्या अध्यक्षतेखालील कुस्ती महासंघावरील निलंबन मागे घेतले होते. त्यानंतर भारतीय ऑलिंपिक असोसिएशनने भारतातील कुस्तीच्या दैनंदिन कामकाजाची देखरेख करणाऱ्या भूपिंदर सिंग बाजवा यांच्या अध्यक्षतेखालील तदर्थ समिती बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. कुस्ती महासंघाच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष संजय सिंह यांना युनायटेड वर्ल्ड रेसलिंग आणि भारतीय ऑलिंपिक असोसिएशनकडून दिलासा मिळाला असला तरी, ते केंद्र सरकारकडून दिलासा मिळण्याची वाट पाहत होते. आता सुमारे १५ महिन्यांनंतर क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघावरील बंदी उठवली आहे. महासंघाच्या निलंबनामुळे कुस्तीगीरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. यामुळे महासंघ आणि क्रीडा मंत्रालयात संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती. आता बंदी उठवण्यात आल्यामुळे देशांतर्गत स्पर्धा आयोजित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठीच्या निवडीचा मार्गही सूकर झाला आहे. मंत्रालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, महासंघाने सुधारात्मक उपाययोजना म्हणून त्यांच्यावरील निलंबन मागे घेतल्या आहेत.