भारतीय उद्योग विश्वाचे रत्न हरपले उद्योगपती रतन टाटा यांचे निधन

मुंबई – भारतीय उद्योग विश्वाचे आधारवड म्हणून ओळखले जाणारे टाटा समूहाचे जेष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर ब्रीचकॅण्डी रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी रात्री साडेअकराच्या सुमारास वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते 22 वर्ष टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष होते. समाजाशी नाळ जोडलेले एक सह्हृद्यी उद्योगपती अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री आदींसह देशाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. आज त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
रतन टाटा यांना सोमवारी रक्तदाबाच्या त्रासामुळे ब्रीचकॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे अति दक्षता विभागात त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरु होते. मात्र त्यांच्या शरीराने उपचारांना साथ दिली नाही. रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
भारतात ज्यांचे नाव कायम आदराने घेतले जाते, अशा मोजक्या नावांपैकी एक असलेले नाव म्हणजे उद्योगपती रतन टाटा. टाटा सन्सचे चेअरमनपद भूषविलेल्या रतन टाटा यांनी उद्योगजगतात टाटा समूहाचा अभूतपूर्व कामगिरीचा झेंडा सातत्याने फडकावत ठेवला. रतन टाटा हे जमशेटजी टाटा यांचे पणतू. त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 साली झाला होता. नवल आणि सुनी टाटा हे त्यांचे आई वडील होते. 1948 साली आईवडील विभक्त झाल्यानंतर रतन टाटा यांचे संगोपन त्यांची आजी नवाजबाई टाटा यांनी केले होते. रतन टाटा हे अविवाहीत राहिले. चार वेळा ते बोहल्यापर्यंत पोहोचले होते, मात्र त्यांचे लग्न होऊ शकले नाही. लॉस एंजलिसमध्ये काम करत असताना आपण एका तरुणीच्या प्रेमात पडलो होतो असे त्यांनी सांगितले होते. मात्र 1962 सालच्या भारत चीन युद्धामुळे तरुणीच्या आईवडिलांनी तिला भारतात पाठवण्यास नकार दिला होता.
1961 साली त्यांनी कौटुंबिक व्यवसायात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. टाटा स्टीलचे दैनंदीन कामकाज पाहण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती.
रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने खूप उंची गाठली. रतन टाटा 1991 मध्ये टाटा समूहाचे अध्यक्ष झाले आणि तेव्हापासून त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. 2012 पर्यंत ते या पदावर होते. त्यांनी 1996 मध्ये टाटा सर्व्हिसेस आणि 2004 मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सारख्या कंपन्यांची स्थापना केली.
भारतीय अर्थव्यवस्थेने उदार धोरण स्वीकारले आणि रतन टाटा यांनी भविष्यातील संधी तसेच आव्हाने ओळखून टाटा समूहाची पुनर्बांधणी करण्याचे ठरवले. व्यवसाय करत असताना मध्यमवर्गाला त्यांनी सातत्याने डोळ्यासमोर ठेवले होते. टाटा नॅनो आणि टाटा इंडिका या दोन गाड्या त्यांच्या कल्पनेतून उतरल्या होत्या. दुचाकीवरून जाणार्‍या कुटुंबावरून त्यांना टाटा नॅनोची कल्पना सुचली. जगातील सगळ्यात स्वस्त कार बनवून दाखवेन असा निर्धार रतन टाटा यांनी केला होता. अवघ्या एका लाखात मिळणारी टाटा नॅनो बाजारात आणून त्यांनी आपला निर्धार पूर्ण केला होता. हा ऑटो क्षेत्रातील एक मोठा चमत्कारच होता.
रतन यांच्या कार्यकाळात ’टाटा टी’ ने टेटलीवर ताबा मिळवला, टाटा मोटर्सने जॅग्वार लँड रोव्हर आणि टाटा स्टीलने कोरस कंपनी आपल्या ताब्यात घेतली. रतन यांच्या कार्यकाळात टाटा समूहाचा 100 हून अधिक देशांत विस्तार झाला. टाटाला त्यांनी एक विश्वसनिय ब्रँड बनवले.
रतन टाटा उद्योगपती म्हणून जेवढे प्रसिद्ध होते तेवढेच एक दानशूर व्यक्ती म्हणूनही प्रसिद्ध होते. टाटा सन्सच्या नफ्यातील मोठा भाग आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण जीवनमान यासारख्या समाजाच्या विविध क्षेत्रांच्या सुधारणेसाठी काम करणार्‍या अनेक ट्रस्टना दान केला जातो. कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी टाटा यांनी सरकारला 15 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते.
रतन टाटा यांना 2000 मघ्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यानंतर त्यांना 2006 मध्ये महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 2008 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. टाटा यांना 2014 मध्ये ऑनररी नाइट ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायरने गौरविण्यात आले . त्यांना 2021 मध्ये आसाम वैभव पुरस्काराने गौरवण्यात आले . रतन टाटा यांना 2023 मध्ये ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या पुरस्करानेदेखील सन्मानित करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्ट करत रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत म्हटले की, श्री रतन टाटा एक दूरदर्शी उद्योगपती , दयाळू आणि विलक्षण व्यक्तीमत्त्व होते. त्यांनी भारतामधील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्यांपैकी एक असलेल्या समूहाला स्थिर नेतृत्व प्रदान केले. त्यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top