वॉशिंग्टन
प्रख्यात भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि सांख्यिकीशास्त्रज्ञ कल्यामपुडी राधाकृष्ण राव यांना २०२३ चा सांख्यिकी आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार या क्षेत्रातील नोबेल पुरस्काराच्या तोडीचा समजला जातो. ७५ वर्षांपूर्वी त्यांच्या कार्याने सांख्यिकीय विचारात क्रांती घडवून आणली. इंटरनॅशनल प्राईज इन स्टॅटिस्टिक्स फाउंडेशनने एका निवेदनात म्हटले आहे की, राव यांच्या ७५ वर्षांपूर्वीच्या कार्याचा विज्ञानावर खोलवर परिणाम झाला.
सी. आर. राव हे आता १०२ वर्षांचे आहेत. त्यांना या जुलैमध्ये ओटावा, ओंटारियो, कॅनडातील द्विवार्षिक इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टॅटिस्टिक्स वर्ल्ड स्टॅटिस्टिकल काँग्रेसमध्ये ८०,००० अमेरिकी डॉलर्स किमतीच्या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. राव यांचा जन्म कर्नाटकातील हदगली येथे एका तेलगू कुटुंबात झाला. त्यांचे शालेय शिक्षण आंध्र प्रदेशातील गुडूर, नुझविद, नंदीगामा आणि विशाखापट्टणम येथे पूर्ण झाले. त्यांनी १९४२ मध्ये आंध्र विद्यापीठातून गणितात एमएस्सी आणि कलकाता विद्यापीठातून सांख्यिकीमध्ये एमए केले. केंब्रिज विद्यापीठाच्या किंग्ज कॉलेजमधून त्यांनी पीएचडी मिळवली तर १९६५ मध्ये त्यांनी केंब्रिजमधून डीएससी पदवीही मिळवली.