नवी दिल्ली- भारत आणि मालदीवमधील संबंध आता आणखी बिघडण्याच्या मार्गावर आहेत. मालदीवमधून भारताने आपले सैन्य मागे घ्यावे अशी औपचारिक विनंती आता मालदीवच्या राष्ट्रपती कार्यालयाने केली आहे. मालदीवचे नवनिर्वाचित राष्ट्रपती मोहम्मद मुईझू हे चीनी समर्थक असून त्यांनी पहिल्या दिवसापासून भारतविरोधी सूर आळवला आहे.
मालदीव सरकारने भारताला मालदीवमधून आपले लष्करी कर्मचारी मागे घेण्याची औपचारिक विनंती केली आहे.मालदीचे राष्ट्रपती डॉ.मोहम्मद मुईझू यांनी काल राष्ट्रपती कार्यालयात भारत सरकारचे मंत्री किरेन रिजिजू यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान औपचारिकपणे ही विनंती केली.केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू मालदीवच्या नवीन राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीच्या कार्यक्रमात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी गेले होते.
त्यावेळी मुईझू यांनी ही विनंती केली.निवडून येण्यापूर्वी मुईझू म्हणाले होते की,मालदीवमधून भारतीय लष्कर हटवणे त्यांचे पहिले प्राधान्य असेल.