नवी दिल्ली – परदेशातून भारतात आलेल्या एका तरुणाला मंकीपॉक्सची संसर्ग झाल्याचा संशय आहे. त्याला रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
संशयित तरुणाला मंकीपॉक्सचा संसर्ग झाला आहे का? याची तपासणी करण्यासाठी त्याचे नमुने घेण्यात आले आहेत. ते नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले असून अहवाल आल्यावर त्याला संसर्ग झाला आहे का’ हे स्पष्ट होणार आहे. देशात मंकीपॉक्सचा प्रसार होऊ नये म्हणून देशाबाहेरून येणाऱ्या प्रवाशांच्या चाचण्या केल्या जात आहेत. मंकीपॉक्सच्या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे आणि सुज यांचा समावेश होतो. यानंतर चेहऱ्यापासून पुरळ उठायला सुरू होतात आणि संपूर्ण शरीरावर पसरतात. डागांपासून मुरुमांपर्यंत पुरळ विकसित होते, जे शेवटी खरुज बनतात. ही लक्षणे सहसा दोन ते चार आठवडे राहतात. अशी लक्षणे दिसताच बाधित व्यक्तीचे विलगीकरण करावे, बाधित व्यक्तीने मास्कचा वापर करावा, रुग्णाची माहिती आरोग्य विभागाला द्यावी, रुग्णाने वापरलेल्या वस्तूंचा वापर टाळावा, साबण, पाणी वापरून हात स्वच्छ ठेवावेत असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२२ ते ३० जून २०२४ या कालावधीत जगभरात मंकीपॉक्सचे एकूण ९९ हजार १७६ रुग्ण आढळले. जून २०२४ मध्ये एकूण ९३४ नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत.