नवी दिल्ली- अफ्रिकेच्या नामीबिया या देशातून चित्ते आणून ते भारतात वसवण्याच्या प्रक्लपातील पहिल्या टप्प्यात अनेक अडचणी आल्या होत्या . आता या प्रकल्पाचा दुसरा टप्पा लवकरच सुरु होईल. भारतात पुन्हा एकदा अफ्रिकेतून चित्त्यांची खेप येणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाचे प्रमुख एस पी यादव यांनी दिली आहे.
‘चित्त्यांची पुढील बॅच दक्षिण अफ्रिकेतून आयात केली जाणार आहे. यावेळी आलेल्या चित्त्यांना मध्य प्रदेशातील गांधी सागर अभयारण्यात आणि नौरादेही अभयारण्यामध्ये ठेवण्यात येईल. तसेच या वर्षाच्या शेवटी हे चित्ते भारतात दाखल होतील’, अशी माहिती यादव यांनी दिली आहे. यासाठी गांधी सागर अभयारण्यात वेगाने तयारी सुरु असून नोव्हेंबर किंवा डिसेंबरपर्यंत ही तयारी पूर्ण होईल. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी या अभयारण्याला भेट देऊन त्याची पाहणी करतील आणि चित्त्यांना आणण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही यादव यांनी सांगितले. सध्या कुनो अभयारण्यात चित्त्याच्या एका बछड्यासह १५ चित्ते आहेत. या अभयारण्याची क्षमता २० चित्ते राहतील एवढी आहे.