नवी दिल्ली –
भारतातील उपग्रह इंटरनेटरून जगातील दोन बड्या उद्योगपतींमध्ये जुंपली आहे. टेस्ला आणि स्टारलिंकसारख्या कंपन्यांचे कंपनीचे मालक एलन मस्क आणि जिओचे मुकेश अंबानी सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवेवरून एकमेकाविरोधात उभे ठाकले आहेत. या सेवांसाठी स्पेक्ट्रमचे थेट वाटप करावे की लिलाव करावा, यावरून दोघांमध्ये मतभेदआहेत. स्पेक्ट्रमचे थेट वाटप करावे, अशी एलन मस्क यांची भलावण आहे, तर स्पेक्ट्रमचा लिलाव करावा, अशी जिओच्या मुकेश अंबानी यांची भूमिका आहे.
देशात सॅटेलाइट इंटरनेटला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहे. अंतराळात असलेल्या उपग्रहांद्वारे उपग्रह इंटरनेट वितरित केले जाणार आहे. त्यासाठी सरकारने अंतराळ क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीचा मार्ग खुला केला आहे.यात सर्वप्रथम एलन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीने रुची दाखवली आहे. त्यानंतर रिलायन्स जिओनेही या क्षेत्रात प्रवेश करण्याचा इरादा जाहीर केला.ट्रायने या इंटरनेटसाठी स्पेक्ट्रमचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. याला रिलायन्स जिओने आक्षेप घेतला आहे. मुकेश अंबानी यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी स्पेक्ट्रमचा निष्पक्ष स्पर्धेसाठी लिलाव करण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर मस्क यांच्या कंपनीने लिलावाऐवजी स्पेक्ट्रम वाटपाची मागणी केली आहे.
मुकेश अंबानींची जिओ कंपनी स्पेक्ट्रमच्या लिलावाच्या बाजूने प्रयत्न करत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यावर मस्क यांनी एक्सवरील पोस्टमधून प्रतिक्रिया दिली की, हे अभूतपूर्व असेल. कारण हा स्पेक्ट्रम खूप आधीच इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनने उपग्रहांसाठी सामायिक स्पेक्ट्रम म्हणून नियुक्त केला होता. डिजिटल तंत्रज्ञानासाठी संयुक्त राष्ट्रांची एक विशेष एजन्सी उपग्रह वापरासाठी सामायिक केलेल्या स्पेक्ट्रमची नियुक्ती करते. आमची स्टारलिंक परवान्यांच्या थेट वाटपासाठी प्रयत्न करत आहे. ही जगभर वापरली जाणारी पद्धत आहे.
रिलायन्सला असे वाटत आहे की, स्पेक्ट्रमचे वाटप करण्याऐवजी लिलाव केल्याने सर्वांसाठी समान खेळाचे मैदान तयार होईल आणि पारंपारिक दूरसंचार खेळाडूंना प्रामाणिकपणे स्पर्धा करता येईल.
भारत जगात सर्वाधिक इंटरनेट वापरणारा चीनपाठोपाठ दुसरा क्रमांकाचा देश आहे. यामुळे इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांचे लक्ष भारताकडे आहे. २०३० पर्यंत भारतातील इंटरनेट १.९ अब्ज डॉलरवर म्हणजे जवळपास १६ हजार कोटी रुपयांवर जाणार आहे. या मार्केटवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी मुकेश अंबानी आणि एलन मस्क समोरासमोर आले आहेत.