भारताच्या प्रयत्नांनी इतिहास घडला आफ्रिकन संघाचा जी-20 त प्रवेश

नवी दिल्ली – जगातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात शक्‍तिशाली देशांचा समूह असलेल्या जी-20 शिखर परिषदेला आजपासून दिल्लीत सुरुवात झाली. भारताच्या प्रयत्नांनी आफ्रिकन संघाचा आता जी-20च्या स्थायी देशांमध्ये समावेश करण्यात आला आहे. यामुळे जी-20 समूह यापुढे जी-21 म्हणून ओळखला जाईल. जी-20 मुळे मानवकेंद्रित आणि सर्वसमावेशक विकासाच्या नव्या वाटा खुल्या होतील, असा विश्‍वास मोदींनी आपल्या भाषणातून दिला. दिल्ली जाहीरनाम्याला या परिषदेत मंजुरी देण्यात आली. पंतप्रधान मोदींनी भारत-मध्य-पूर्व-युरोप मेगा आर्थिक कॉरिडॉरची घोषणाही केली.
दिल्लीच्या प्रगती मैदानावर 18 व्या जी-20 शिखर परिषदेला आजपासून दिमाखात सुरुवात झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष या परिषदेसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. आज सकाळी साडेनऊ वाजता भारत मंडपममध्ये परिषदेला सुरुवात झाली. त्यानंतर फोटो सेशन झाले. या परिषदेत वन अर्थ (एक पृथ्वी), वन फॅमिली (एक कुटुंब) आणि वन फ्युचर (एक भविष्य) अशी तीन प्रमुख सत्रे होणार आहेत. यापैकी पहिली दोन सत्रे आज झाली. पहिल्या सत्राच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदींनी आफ्रिकन युनियनच्या प्रमुखांना जी-20 चे स्थायी सदस्य म्हणून आपले स्थान घेण्याचे निमंत्रण दिले. यावर परिषदेत पोहोचलेल्या आफ्रिकन युनियनचे प्रमुख आणि कोमोरोस देशाचे अध्यक्ष अझाली असौमानी यांनी पंतप्रधानांची गळाभेट घेतली. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. आता जी-20 नव्हे जी-21 म्हटले जाईल असे मोदींनी घोषित केले. आफ्रिकन युनियनला जी-20 सदस्यत्व मिळाल्याने आफ्रिकेतील 55 देशांना याचा फायदा होणार आहे.
पंतप्रधान मोदींनी आज पहिल्या सत्रात प्रस्तावना करताना म्हटले, ‘एकविसावे शतक जगाला नवी दिशा देणारे ठरणार आहे, त्यासाठी सगळ्यांनी एकत्र काम करून मानवतेचा विकास केंद्रस्थानी ठेवून प्रगती करायची आहे. या काळात महिलांना केंद्रबिंदू ठेवून आपण प्रगती करायची आहे. कोरोनामुळे विश्‍वासाला तडा गेला आहे. तो विश्‍वास परत मिळवण्यासाठी ‘सबका साथ, सबका विश्‍वास, सबका विकास’ हा मंत्र महत्त्वाचा आहे. भारताकडे असलेले अध्यक्षपद सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, निर्णायक आणि कृती-केंद्रित आहेत. अडीच हजार वर्षांपूर्वी भारताने जगाला संदेश दिला होता. ‘मानवतेचे कल्याण व सुख नेहमीच सुनिश्‍चित केले जायला हवे’ हा संदेश आठवून आपण जी-20 परिषदेला सुरुवात करुया. आफ्रिकन महासंघाला जी-20 ची सदस्यता द्यावी हा भारताचा प्रस्ताव आपण सर्वांनी मान्य केला. त्यामुळे ते बैठकीला आमंत्रित आहेत.’
‘वन अर्थ’ हे सत्र दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू होते. ते संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ब्रिटनचे भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी द्विपक्षीय चर्चा झाली. या चर्चेत दोन्ही नेत्यांमध्ये भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करारावर चर्चा झाली. दोन्ही देशांतील व्यापार संबंध अधिक दृढ करण्याच्या आणि गुंतवणूक वाढविण्याच्या विविध मार्गांवर चर्चा झाल्याचे पंतप्रधान मोदी यांनी एक्सद्वारे कळवले. त्यानंतर ‘वन फॅमिली’ हे सत्र सुरू झाले. या सत्राच्या अखेरीस दिल्ली जाहीरनाम्यावर जी-20 राष्ट्रांचे एकमत झाले आहे, असे पंतप्रधान मोदींनी जाहीर केले. नेत्यांनी आज मान्य केलेल्या घोषणेमध्ये मजबूत शाश्‍वत, संतुलित आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यावर भर देण्यात आला आहे. त्यानुसार कृती आराखडा तयार केला आहे. यामध्ये शाश्‍वत भविष्यासाठी हरित विकास कराराची कल्पना केली आहे, अशी माहिती परिषदेच्या शेवटी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी माध्यमांना दिली. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन, भारताचे जी-20 शेर्पा अमिताभ कांत यांनीही आपले विचार व्यक्त केले. कांत म्हणाले, 100 टक्के सहमतीने बनलेला हा जाहीरनामा अभूतपूर्व आणि एतिहासिक आहे.
आज सुनक यांच्याव्यतिरिक्त कॅनडा, तुर्की, यूएई, दक्षिण कोरिया, युरोपीय संघ, ब्राझील, कोमोरोस, नायजेरिया या देशांच्या प्रमुखांशीही मोदी यांनी द्विपक्षीय बैठका घेतल्या.
पंतप्रधान मोदींनी भारत-मध्य-पूर्व-युरोप मेगा आर्थिक कॉरिडॉरची घोषणाही केली. या कॉरिडॉरमुळे जी-20 परिषदेतील सहभागी देशांमध्ये कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांना बळ मिळणार आहे. यावेळी त्यांनी भौतिक पायाभूत सुविधा, सामाजिक पायाभूत सुविधा, डिजिटल पायाभूत सुविधा आणि आर्थिक पायाभूत सुविधेत अभूतपूर्व गुंतवणूक होत असल्याचे स्पष्ट केले. या करारात भारत, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, युरोपियन युनियन, फ्रान्स, इटली, जर्मनी आणि अमेरिका यांचा समावेश आहे.
ड्रोन, सेमीकंडक्टरसाठी करार
मोदी – बायडन द्विपक्षीय चर्चा

जो बायडन हे जी-20 परिषदेसाठी काल सायंकाळी दिल्लीत दाखल झाले. त्यानंतर मोदींच्या निवासस्थानी भारत-अमेरिकेत द्विपक्षीय चर्चा झाली. ही बैठक सकारात्मक झाल्याची माहिती मोदींनी दिली. यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीमध्ये कायम सदस्यत्व, चांद्रयान-3 मोहिमेबाबतही चर्चा झाली. दोन्ही देशांच्यावतीने संयुक्त निवेदन जारी करण्यात आले. त्यानुसार 2024 च्या सुरुवातीच्या महिन्यात क्वाड सदस्य देशांची बैठक आयोजित केली जाणार आहे. या क्वाड गटात भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश आहे.
मोदींसोबतच्या भेटीत बायडन यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या कायम सदस्यत्वाला पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी चांद्रयान-3 आणि आदित्य एल-1 या अंतराळ मोहिमेबाबतही मोदींचे अभिनंदन केले. राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी अमेरिकेकडून 31 प्रीडेटर ड्रोन खरेदी करण्याबाबत भारताच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या विनंती पत्राचे स्वागत केले. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी मजबूत जागतिक सेमीकंडक्टर पुरवठा साखळी तयार करण्यावर भर दिला. याअंतर्गत मायक्रोचीप टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून भारतात व्यवसाय आणि संशोधन वाढवण्यासाठी 300 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करणार आहे. याशिवाय अ‍ॅडव्हान्स्ड मायक्रो डिव्हाईसने पुढील 5 वर्षांत भारतात 400 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा
केली आहे.

‘इंडिया’ विरुद्ध ‘भारत’
‘इंडिया’ विरुद्ध ‘भारत’ या सुरू असलेल्या वादाची झलक जी-20 परिषदेतही पाहायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतपर भाषणाने जी-20 शिखर परिषदेची सुरुवात झाली. मोदींनी आपल्या भाषणात देशाला ‘भारत’ असे संबोधलेच, शिवाय त्यांच्या आसनासमोर टेबलावर ठेवलेल्या नावाच्या पाटीवरही ‘इंडिया’ ऐवजी इंग्रजी अक्षरांमध्ये ‘भारत’ असे लिहिले होते. आतापर्यंत जागतिक व्यासपीठावर कुठेही देशाचा ‘भारत’ असा उल्लेख करण्यात आला नव्हता. संयुक्त राष्ट्राने सांगितले की, प्रक्रिया पूर्ण केल्यावर भारत म्हणू.

जी – 20: आजचे कार्यक्रम
-8.15 ते 9 – नेते आणि त्यांच्या शिष्टमंडळ प्रमुखांचे राजघाटावर आगमन
-9 ते 9.20 – महात्मा गांधींच्या समाधीस्थळी श्रद्धांजली
-9.40 ते 10.15 – भारत मंडपम मध्ये नेत्यांचे आगमन
-10.15 ते 10.30 – भारत मंडपमच्या दक्षिण प्लाझामध्ये वृक्षारोपण
-10.30 ते दु.12.30 – ’वन फ्युचर’ (एक भविष्य) हे तिसरे सत्र

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top