मुंबई – भारताचे माजी सलामीवीर आणि तब्बल तीन दशके मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये क्युरेटरचे काम पाहणारे सुधीर नाईक यांचे आज निधन झाले. त्यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अल्पशा आजारपणामुळे ते सात दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते. आयसीयू मध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. यादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. नॅशनल क्रिकेट क्लबमध्ये प्रशिक्षित असताना त्यांच्या हाताखाली जहीर खान, वसीम जाफर, राजेश पवार, राजू सुतार, पारस म्हाम्ब्रे इत्यादी खेळाडू घडले.
सुधीर नाईक यांनी १९७४ साली भारताकडून तीन कसोटी व दोन वन डे सामने खेळले होते. स्फोटक सलामीवीर अशी त्यांची ओळख होती. १९७४ च्या इंग्लंड दौऱ्यावर ते टीम इंडियाच्या सलामीच्या जागेसाठी दावेदार होते. १९७३-७४ मध्ये बरोडाविरुद्ध नाबाद २०० धावा ही त्यांची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४०.५५ च्या सरासरीने ७३० धावा केल्या होत्या. प्रथम श्रेणी क्रिकेटच्या कामगिरीमुळे त्यांना एडबस्टन कसोटीत खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामने खेळले होते. तसेच मुंबई संघाकडून रणजी करंडक स्पर्धेमध्ये त्यांनी ४०.१०च्या सरासरीने २६८७ धावा केल्या होत्या. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईने १९७०-७१ मध्ये रणजी करंडक पटकावला होता.