नवी दिल्ली – भारताचा विकास दर यंदाही (२०२३-२४) घटण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केला आहे. यापूर्वी नाणेनिधीने ६.१ टक्के विकास दर राहण्याचा अंदाज व्यक्त केला तो आता ५.९ टक्के राहील, असे सांगण्यात येते. नाणेनिधीने वार्षिक आर्थिक अंदाज व्यक्त केला. त्यानुसार एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या आर्थिक वर्षात ६.३ टक्के विकास राहील,असा अंदाज व्यक्त केला होता. तर २०२३ – २४ चा विकास दर ६.१ टक्के राहण्याचा अंदाज मागील वर्षी व्यक्त करण्यात आला होता. मात्र, हा दर आता ५.९ टक्के राहणार आहे.
आरबीआयच्या अंदाजापेक्षा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या विकास दराचा अंदाज कमी आहे. आरबीआयने २०२२-२३ मध्ये ७ टक्के विकास दर नोंदवला होता, तर २०२३-२४ ला भारताचा विकास दर ६.४ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला. यंदाच्या आर्थिक वर्षात विकासाचा वेग कमी होणार असला तरीही भारत हीच जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. कोरोना महामारी व रशिया – युक्रेन युद्धामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा दबाव आला आहे.
कोरोना काळानंतर अर्थव्यवस्था खुली झाल्याने चीनची घोडदौड पुन्हा सुरू झाली. युद्धामुळे ऊर्जा व अन्नधान्यांची बाजारपेठांची पुरवठा साखळी उद्ध्वस्त झाली आहे, असे नाणेनिधीचे मुख्य आर्थिक सल्लागार पिआरे ऑलिव्हर गौरिंचस यांनी सांगितले. २०२३ – २४ मध्ये जगाचा विकास दर २.८ टक्के राहण्याची शक्यता आहे. यापूर्वी नाणेनिधीने ३ टक्के व्याजदराचा अंदाज व्यक्त केला होता. तसेच जागतिक पातळीवर महागाई कमी होण्याची शक्यता आहे. २०२२ मध्ये ही महागाई ८.७ टक्के होती. ती या वर्षाखेर ७ टक्के होईल, तर २०२४ अखेरपर्यंत ती ४.९ टक्के राहण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले.