नवी दिल्ली- रशियाहून आयात केल्या जाणार्या कच्च्या तेलाची आयात नव्या उच्चांकी स्तरावर गेली आहे. सरत्या मे महिन्यात सौदी अरब, इराक, संयुक्त अरब अमिरात आणि अमेरिकेहून आयात करण्यात आलेल्या एकत्रित कच्च्या तेलापेक्षा जास्त आयात रशियाहून करण्यात आली असल्याची माहिती वोरटेक्सा या संस्थेने ताज्या अहवालात दिली आहे.
मे महिन्यात प्रती दिवस १.९६ दशलक्ष बॅरल इतकी कच्च्या तेलाची आयात रशियाहून करण्यात आली. एप्रिल महिन्याच्या तुलनेत ही वाढ १५ टक्क्यांनी जास्त होती. देशाला लागणार्या कच्च्या तेलापैकी ४२ टक्के आयात रशियाहून केली जात आहे.एकाच देशातून इतक्या मोठ्या प्रमाणात तेलाची आयात केली जाण्याची ही मागील काही वर्षांतील पहिलीच वेळ आहे. सध्या सौदी अरेबियाकडून केली जाणारी आयात ५ लाख ६० हजार टनांपर्यंत कमी झाली आहे. फेब्रुवारी २०२१ पासूनचा हा सर्वांत कमी आकडा आहे. ओपेक देशांकडून केली जाणारी कच्च्या तेलाची आयातदेखील सर्वकालीन नीचांकी स्तरावर म्हणजे ३९ टक्क्यांवर आली आहे.
ओपेक संघटनेत प्रामुख्याने आखाती देश आणि आफ्रिकन तेल उत्पादक देशांचा समावेश आहे. काही वर्षांपूर्वी ओपेक देशांकडून भारत तब्बल ९० टक्के इतक्या कच्च्या तेलाची आयात करीत होता. रशिया-युक्रेन युद्धानंतर पाश्चात्य देशांनी रशियन तेलाच्या आयातीवर बंदी घातली होती.दुसरीकडे भारत,चीन यासारख्या मोठ्या देशांना बाजारभावापेक्षा कमी दरात कच्चे तेल देण्याचा निर्णय रशियाने घेतला होता. याचमुळे भारताने रशियन तेलाची आयात वाढली आहे.
भारताकडून रशियन तेल आयातीचा नवा विक्रम! खरेदीत १५ टक्के वाढ
