मुंबई – मुंबई शहरातील भायखळा, शिवडी, देवनार, मानखुर्द या मतदारसंघांच्या प्रदूषण समस्येकडे सर्व पक्षांनी दुर्लक्ष केले आहे. पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांची कामे, बांधकामे आणि अन्य कारणांमुळे मागील काही वर्षात मुंबईतील अनेक परिसर प्रदूषित झाले आहेत.
भायखळा, शिवडी हे नेहमीच अशुद्ध हवेसाठी चर्चेत असलेले मतदारसंघ आहेत. त्याचबरोबर देवनार, मानखुर्द , गोवंडी, कांजूरमार्ग या परिसराचा देखील या यादीत समावेश आहे. प्रदूषणामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र या प्रश्नावर राजकीय पक्ष, उमेदवारांचे लक्ष वेधले जात नाही. शिवडी, भायखळा, मानखुर्द, देवनारमध्ये सध्या सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार जोरात सुरु आहे. उमेदवार मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. यावेळी रस्ते, वाहतुकीच्या समस्येपासून पुनर्विकासाच्या समस्येपर्यंत, शिक्षण, आरोग्यापासून रोजगारापर्यंतच्या विषयावर आश्वासने दिली जात आहेत. पण महत्त्वाच्या अशा प्रदूषणाच्या विषयावर कोणताही उमेदवार बोलत नाही. निवडणूक प्रचारात हा प्रश्न मांडला जात नाही किंवा राजकीय पक्षाच्या जाहिरनाम्यात प्रदूषणाचा मुद्दा नमूद नाही. त्यामुळे आता उमेदवारांनी या समस्येकडे लक्ष देत ही समस्या दूर करण्यासाठी लक्ष देण्याची मागणी मतदारांकडून होत आहे.
देवनारमध्ये कचराभूमी आणि जैव वैद्याकीय कचऱ्यामुळे येथे प्रदूषणाचा पूर्वीपासून प्रश्न गंभीर आहे. आता गोवंडीतील रहिवाशी मुंबईतील प्रदूषित हवेमुळे हैराण झाले आहेत. दरम्यान, नैसर्गिक कारणांबरोबच अनेक मानवनिर्मित कारणेही मुंबईच्या प्रदूषणात भर घालत आहेत. पायाभूत सुविधा प्रकल्पाची कामे आणि बांधकामे त्यातून उडणारी धूळ हवेचा दर्जा ढासळण्यास कारणीभूत ठरत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे.