मुंबई – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि भाडेकरू कृती समितीचे अध्यक्ष कॉम्रेड मदन नाईक यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. आज सकाळी विक्रोळी येथील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. नाईक यांच्या भाडेकरू कृती समितीने अनेक भाडेकरूंना हक्काचा निवारा मिळवून दिला. ते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही सहभागी होते.
\’पथिक\’ हे त्यांचे आत्मचरित्रपर पुस्तक प्रसिद्ध होते. नोकरीच्यानिमित्ताने नाईक कोकणातून मुंबईत आले. सुरुवातीला ते गिरगाव भागात राहत होते. कामगारांच्या परिसरात कम्युनिस्ट कलापथकांचे पथनाट्य आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमातून ते डाव्या चळवळीकडे ओढले गेले. कम्युनिस्ट कलापथकातही त्यांनी काही काळ काम केले होते. तसेच त्यांनी औद्योगिक कामगारांसह बेघर आणि झोपडपट्टीवासीयांना संघटित केले. त्यांच्या निवाऱ्याची सोय केली. शहरी निवाऱ्याच्या प्रश्नी नाईक हे ज्ञानकोश मानले जात असत. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्विकासात त्यांचा सल्ला मोलाचा ठरत असे. त्यांच्या निधनाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अतोनात नुकसान झाले असून विविध प्रश्नांवर मिळत असलेल्या त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाला मुकले असल्याची भावना माकपचे सरचिटणीस डॉ. उदय नारकर यांनी व्यक्त केली.