जळगाव – भाजप नेते तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवशी लावण्यात आलेल्या पोस्टर व जाहिरातीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे फोटो झळकले.
गिरीश महाजन आज वाढदिवस होता. जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मंत्री महाजन यांनी वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. मात्र, काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी महाजन यांच्या वाढदिवसानिमित्ताने होर्डिंग लावले. त्यात शरद पवार आणि राज्याचे अजित पवार यांचे फोटो चर्चेचा विषय बनले.
गिरीश महाजन यांचा वाढदिवसानिमित्ताने एका दैनिकात जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि माजी मंत्री सुरेश जैन यांचे फोटो होते. या जाहिरातीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचाही फोटो होते. त्यातही अजित पवार यांचा फोटो सर्वात मोठा होता. या फोटोखाली ‘जिवाभावाचा माणूस’, असेही लिहिण्यात आले. याच जाहिरातीत शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही फोटो छापण्यात आले होते. पवार-मोदींच्या फोटोखाली अजित पवार, फडणवीस आणि महाजन या तिघांचा एकत्रित फोटोही झळकला होता.