जळगाव – भाजपा हे माझ्यापुढील आव्हान नाही तर भाजपा राज्यावर आहे तोपर्यंत देशाचे आणि राज्याचे जे नुकसान होईल ते भरून काढणे हे माझ्यापुढील आव्हान आहे, असा घणाघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केला. जळगावच्या पाचोरा येथील जाहीर सभेत त्यांनी भाजप आणि मिंधे गटाला आव्हान दिले. ते म्हणाले की, हिम्मत असेल तर आता निवडणुका घेऊन दाखवा. तुम्ही चोरलेले धनुष्यबाण घेऊन या. मोदींचा चेहरा घेऊन या, मी मशाल घेऊन येतो. या मशालीची अशी धग लावू की, त्यात तुमचे सिंहासन जळून खाक होईल.
भाजपाला देशात कुठलाही प्रादेशिक पक्ष ठेवायचा नाही, अशी टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले की, कुणीही सत्य बोलले की त्याच्या विरोधात धाडी टाकल्या जातात. त्याच्यामागे ईडी, सीबीआय लावली जाते. परंतु तोच भाजपात गेला की, त्याला गोमुत्राने अंघोळ घालून शुद्ध केले जाते. सत्यपाल मलिक यांनी काही दिवसांपूर्वी पुलवामाच्याबाबतीत सत्य सांगितले. तर त्यांना सीबीआयची नोटीस पाठवण्यात आली. त्यांना काही बोलू नका, असे सांगण्यात आले होते. आज माझ्याबरोबर असलेल्या अनेक नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला आहे. पण तुम्ही किती जणांना आत टाकणार आहात? पोलीस पाठवून छळवाद करणे हा नामर्दपणा आहे. अदानीवरून प्रश्न विचारणार्या राहुल गांधींनाही याचप्रकारे त्रास दिला आहे. मी मुख्यमंत्री असताना कुठल्याही धर्मावर अन्याय केला नाही. मी हिंदुत्व सोडलेले नाही आणि सोडणारही नाही. माझे हिंदुत्व शेंडी जानव्याचे नाही. भाजपाने आपले हिंदुत्व कसले आहे हे सांगावे, असेही त्यांनी भाजपाला सुनावले. भाजपा पुढची निवडणूक मिंधे गटाच्या नेतृत्वाखाली लढणार का? असा प्रश्नही उद्धव ठाकरे
यांनी विचारला.
भाजपा जाईपर्यंत जे नुकसान करील त्याची चिंता आहे! उद्धव ठाकरे
