भाजपा आणि शिंदे गट पुन्हा जाहीरपणे भिडले रवींद्र चव्हाण-रामदास कदमांचे एकमेकांवर आरोप

रत्नागिरी – विधानसभेची निवडणूक जवळ येत आहे तशी महायुतीतील तिन्ही पक्षांमधील धुसफूस दररोज उघड होऊ लागली आहे. आज कोकणच्या दोघा नेत्यांनी एकमेकांवर जहरी टीका केली. शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण एकमेकांना भिडले. अखेर फडणवीस यांनी शिंदेंना दम भरला की, यापुढे असे खपवून घेतले जाणार नाही.
गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून रामदास कदम यांनी चव्हाण हे कुचकामी मंत्री आहेत, अशी टीका करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चव्हाणांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली. त्यानंतर महायुतीत असूनही भाजपाला अनेकदा डिवचणार्‍या रामदास कदम यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दांत सुनावले की, रामदास कदम असे वारंवार टोकाचे बोलतात. ते आम्हाला मान्य नाही. मी याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलेन.
ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे खेड-दापोली-मंडणगड येथील शिंदे गटाच्या पदाधिकार्‍यांचा मेळावा पार पडला. त्यानंतर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. रामदास कदम म्हणाले की, 14 वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम होत नाही. चाकरमान्यांचे हाल होत आहेत. समृद्धी महामार्ग तीन वर्षांत होतो. मग हा महामार्ग का नाही? केवळ चमकोगिरी करण्यापेक्षा आणि शायनिंग मारण्यापेक्षा मुंबई-गोवा महामार्गाचे खर्‍या अर्थाने काम झाले पाहिजे. अनेक पूल झालेले नाहीत. एका बाजूने रस्ता आहे, तो पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. अशी अवस्था असताना नुसता पाहणी दौरा कशासाठी? खरेतर देवेंद्र फडणवीसांनी रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घेतला पाहिजे. मी थेट सांगतो, ते कुचकामी मंत्री आहेत. कोकणवासियांचे हाल आम्हाला बघवत नाही. कोकणातील माणसे आम्हाला जाब विचारतात. आम्ही किती सहन करणार? महायुतीत असतानादेखील मला बोलावे लागते. मात्र माझा नाईलाज आहे. सगळ्याच जागा यांना हव्या असतील तर युतीत कशाला राहायचे. युती तोडून टाका. मी दाऊदला घाबरत नाही, तर रवींद्र चव्हाण कोण आहेत? रामदास कदम असेही म्हणाले की, दापोलीतील भाजपामध्ये राक्षसी महत्त्वाकांक्षा निर्माण झाली आहे. मी त्यांना सांगितले आहे की, हे थांबवा. मी दिल्लीला मोदी, शहा आणि मोहन भागवत यांना पत्र पाठवले आहे की, तुमचा जो सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे, त्याला आवरा. तो युती तोडण्याचे काम करतो आहे. दापोलीतील भाजपा आमच्या मुळावर कशी उठली आहे हे मी दिल्लीला कळवले आहे. रामदास कदम यांचे पुत्र योगेश दापोली मतदारसंघाचे आमदार आहेत. हा मतदारसंघातील भाजपाच्या राजकारणामुळे कदम अस्वस्थ झाले आहेत. तोच राग आज त्यांनी चव्हाणांवर काढला.
रामदास कदम यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी थेट त्यांच्या कर्तृत्वाबाबतच सवाल उपस्थित केला. ते म्हणाले की, रामदास कदम उद्धव ठाकरेंच्या काळात मंत्री होते. त्यांनी कधी कोणते काम केले? 35-40 वर्षांत काय काम केले? त्यांनी एक तरी काम केलेले दाखवा. मोठमोठ्या हुशार्‍या करतात. उद्धव ठाकरे त्यांना उगीच महत्त्व देत होते. आता ते चालणार नाही. युतीधर्म मी एकटाच पाळणार नाही. मी मुख्यमंत्र्यांना सांगेन की, युती धर्म पाळण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे. भाजपा म्हणून आपण अतिशय संयम, सौजन्याची भूमिका घेऊन विकास कामे, लोकांची कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहोत. रामदास कदम आपणास विकास कामांच्या विषयावरून लक्ष्य करत असतील तर सौजन्याचा मार्ग बाजूला ठेवून आपण जशास तसे उत्तर देण्यास आणि प्रसंगी वाईट वागण्यासही तयार आहोत. एरवी महायुतीच्या नेत्यांमधील वादावर पटकन प्रतिक्रिया न देता आपसातच वाद मिटवण्यावर भर देणार्‍या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही रामदास कदम यांच्या आजच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, रामदास कदम असे वारंवार टोकाचे बोलतात. त्याने आमचे मन देखील दुखावले जातात. शेवटी आम्हीही माणूस आहोत. 50 गोष्टी आम्हालाही त्याच्या उत्तरावर बोलता येतील. जे मोठे नेते आहेत त्यांनी काहीतरी पथ्य पाळावे. वारंवार भारतीय जनता पक्षाला असे बोलणे हे आम्हाला मान्य नाही. या प्रकारचे आरोप करणे हे युती धर्मात बसत नाही. जर रामदास भाईंचे काही म्हणणे असेल तर त्यांनी अंतर्गत ते मांडले पाहिजे. प्रत्येक वेळी भाजपाला, भाजपाच्या नेत्यांना अशा प्रकारे वेठीस धरणे यातून एक चांगली भावना तयार होत नाही असे मला वाटते. रामदास कदमांबाबत मी स्वतः एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार आहे. जे मोठे नेते आहेत त्यांनी काहीतरी पथ्य पाळावे. वारंवार भारतीय जनता पक्षाला असे बोलणे हे आम्हाला मान्य नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top