मुंबई – राज्यातील निवडणुकीपूर्वी मौलाना सज्जाद नोमानी यांनी भाजपाविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. यासंदर्भात नोमानी यांनी बिनशर्त माफी मागितली असून, याबाबत खुलासा करणारे पत्रक काल एक्सवरून पोस्ट केले.
ऑल इंडिया एकता फोरमचे अध्यक्ष मौलाना सज्जाद नोमानी यांचा भाजपाला पाठिंबा देणाऱ्या मुस्लिमांवर बहिष्कार टाका, भाजपाला मत देऊ नका, महाविकास आघाडीला साथ द्या. असे वादग्रस्त वक्तव्य असलेला व्हिडीओ व्हायरल झाला होता. नोमानी यांच्या विधानामुळे महायुतीने प्रचारादरम्यान महाविकास आघाडीवर टीका केली होती. मौलाना सज्जाद नोमानी म्हणाले की, भाजपाला मतदान करणाऱ्या मुस्लिमांवर बहिष्कार टाकण्याचे विधान चर्चेत आले होते. मात्र ज्यांनी लोकांना लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या मुलभूत अधिकारापासून रोखले होते, त्या लोकांना उद्देशून ते विधान होते. त्यामुळे वक्तव्याचा संदर्भ काढून त्याबाबत चर्चा करणे चुकीचे होते. हे वक्तव्य महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या खूप आधी सप्टेंबर २०२४ मध्ये केले होते. ते वक्तव्य कोणत्याही समाजाच्या विरोधात नव्हते, अथवा तो कोणत्याही प्रकारचा फतवा नव्हता. परंतु त्यामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो. आणि याबद्दल मी बिनशर्त माफी मागतो.
ते पुढे म्हणाले की, मी नेहमी सत्य आणि न्यायासाठी संघर्ष करतो. सामान्य जनतेला ज्यांच्यामुळे त्रास होतो त्यांचा नेहमी विरोध करतो. ती व्यक्ती मुस्लीम समाजाची असेल तरी मी त्या व्यक्तीचा विरोध करतो.