भाजपाचे 99 उमेदवार जाहीर! चव्हाणांना विशेष बक्षीस बावनकुळेंचे कमबॅक! मुंबईतील दोन जागा मनसेसाठी सोडल्या?

मुंबई – भाजपाने आज विधानसभा निवडणुकीत आघाडी घेत आपल्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत कोणताही नवा चेहरा न घेता बहुतेक करून विद्यमान आमदारांनाच तिकीट देण्यात आले आहे. या यादीत 13 महिला, 4 अनुसूचित जाती आणि 6 अनुसूचित जमातीचे उमेदवार आहेत. भाजपापाठोपाठ महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीची यादीही आता जाहीर होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस सोडून भाजपात आलेले अशोक चव्हाण यांना खासदारकीचे तिकीट दिल्यानंतर आता त्यांची कन्या श्रीजया चव्हाण हिला भोकरमधून आमदारकीचेही तिकीट देण्यात आले आहे. त्याचबरोबर रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे (भोकरदन), बाबासाहेब फुंडकर यांचे पुत्र आकाश फुंडकर (खामगाव) आणि बबन पाचपुते यांची पत्नी प्रतिभा पाचपुते (श्रोगोंदा) या चार परिवारांवर विशेष मेहरबानी दाखवली आहे. शरद पवार यांना भेटून पक्ष सोडण्याची धमकी दिल्यानंतर गणेश नाईक यांना ऐरोली मतदारसंघाचे तिकीट देण्यात आले. मात्र मंदा म्हात्रे यांचा पत्ता कापून बेलापूर मतदारसंघ आपल्या मुलासाठी मिळवण्यात त्यांना यश आले नाही. गेल्या निवडणुकीत अनेक आरोप झाल्यानंतर मंत्री असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे यांना तिकीट नाकारण्यात आले होते. त्यानंतर जादूची कांडी फिरून विनोद तावडे हे केंद्रात सरचिटणीस झाले आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्ष होण्याची संधी देण्यात आली. यावेळी बावनकुळे यांच्यावर आणखी मेहरबानी दाखवत टेकचंद सावरकर यांचे तिकीट कापून कामठी मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली आहे. नारायण राणे पुत्र नितेश राणे यांना कणकवलीची उमेदवारी मिळाली असून, दुसरा पुत्र नीलेश यांना कुडाळ-मालवण येथून उमेदवारी हवी आहे. यासाठी नारायण राणे आणि नीलेश राणे यांनी आज वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे नीलेश राणे यांना शिंदे गटातून उमेदवारी दिली जाते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खासदारकीसाठी प्रयत्न करणारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आता कुलाबा येथून आमदारकीचे तिकीट मिळाले आहे. रोहित पवार यांच्याकडून गेल्यावेळी पराभूत झालेले राम शिंदे यांना पुन्हा याही वेळेस त्यांच्याच विरोधात कर्जत-जामखेडमध्ये लढा द्यायचा आहे. चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोल्हापूर या मूळ गावी जम बसविण्याचा केलेला प्रयत्न असफल झाल्यानंतर त्यांना पुण्यात भाजपाचा बालेकिल्ला समजला जाणार्‍या कोथरूडमध्ये आणून स्थानापन्न करण्यात आले. गेल्याच निवडणुकीत त्यांनी कोथरूड भागात भाड्याने घर घेतल्याचेही जाहीर केले होते. आता कोथरूड मतदारसंघ कायमसाठी त्यांच्याकरिता देण्यात आला आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून अश्विनी जगताप यांच्याऐवजी शंकर जगताप हे निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत.
कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिंदेसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमदार गणपत गायकवाड किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिल्यास आपण अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचा इशारा महेश गायकवाड यांनी दिला होता. द्वारली येथील एका जमिनीच्या वादातून आमदार गायकवाड यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात शहर प्रमुख गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची घटना फेब्रुवारी 2024 मध्ये घडली. या गोळीबार प्रकरणी आ. गायकवाड सध्या तळोजा कारागृहात आहेत. त्यांना अजूनही जामीन मिळालेला नाही. त्यामुळे भाजपाने आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नीला विधानसभा निवडणुकीत उतरवले आहे.
मुंबईत भाजपाचा बोरिवली या मतदारसंघाबाबत अजून निर्णय झालेला नाही. या मतदारसंघातून सुनील राणे यांना उमेदवारी द्यायची की त्यांच्या आधी तो मतदारसंघ ज्यांचा होता ते गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी द्यायची याचा निर्णय न झाल्याने हा मतदारसंघ पहिल्या यादीत दिसला नाही. मुंबईचे वरळी आणि शिवडी या दोन मतदारसंघाबाबत अजूनही निर्णय नाही. हे दोन मतदारसंघ शिंदे गटासाठी सोडले असल्याचे म्हटले जात असले तरी या मतदारसंघात मनसे आपले उमेदवार देणार असल्याने हे दोन मतदारसंघ मनसेसाठी सोडले जातील असे सांगितले जाते. मनसेने शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर आणि वरळी मतदारसंघातून संदीप देशपांडे यांचे नाव जाहीर केले आहे.
1) देवेंद्र फडणवीस – नागपूर पश्चिम 2) चंद्रशेखर बावनकुळे – कामठी 3) राजेश पाडवी – शहादा 4) विजयकुमार गावित – नंदूरबार 5) अनुप अग्रवाल – धुळे शहर 6) जयकुमार रावल – सिंदखेडा 7) काशीराम पावरा – शिरपूर 8) अमोल जावले – रावेर 9) संजय सावकारे – भुसावळ 10) सुरेश भोळे – जळगाव शहर 11) मंगेश चव्हाण – चाळीसगाव 12) गिरीश महाजन – जामनेर 13) श्वेता महाले – चिखली 14) आकाश फुंडकर – खामगाव 15) संजय कुटे- जळगाव (जामोद)16) रणधीर सावरकर – अकोला पूर्व 17) प्रताप अडसद – धामगाव रेल्वे 18) प्रवीण तायडे – अचलपूर 19) राजेश बकाने – देवली 20) समीर कुणावार – हिंगणघाट 21) पंकज भोयर – वर्धा 22) समीर मेघे – हिंगना 23) मोहन माते – नागपूर दक्षिण 24) कृष्ण खोपडे – नागपूर पूर्व 25) विजय रहांगडाले – तिरोरा 26)विनोद अग्रवाल – गोंदिया 27) संजय पुरम – अमगांव 28) कृष्णा गजबे – आर्मोली 29) सुधीर मुनगंटीवार – बल्लारपूर 30) बंटी भांगडिया – चिमूर 31) संजीवरेड्डी बोडकुरवार – वणी 32) अशोक उडके – राळेगाव 33) मदन येरवर – यवतमाळ 34) भीमराव केरम – किनवट 35) श्रीजया चव्हाण – भोकर 36) राजेश पवार – नायगाव 37) तानाजी मुटकुले – हिंगोली 38) मेघना बोर्डीकर – जिंतूर 39) बबनराव लोणीकर- परतूर 40) तुषार राठोड – मुखेड 41) नारायण कुचे – बदनापूर 42) संतोष दानवे – भोकरदन 43) अनुराधा चव्हाण – फुलंब्री 44) अतुल सावे – औरंगाबाद पूर्व 45) प्रशांत बंब – गंगापूर 46) दिलीप बोरसे-बागलाण 47) राहुल अहेर – चंदवड 48) राहुल ढिकळे – नाशिक पूर्व 49) सीमाताई हिरे – नाशिक पश्चिम 50) राजन नाईक – नालासोपारा 51) महेश चौघुले- भिवंडी पश्चिम 52) किसन कथोरे – मुरबाड 53) सुलभा गायकवाड- कल्याण पूर्व 54) रवींद्र चव्हाण – डोंबिवली 55) संजय केळकर- ठाणे 56) गणेश नाईक- ऐरोली 57) मंदा म्हात्रे – बेलापूर 58) मनीषा चौधरी – दहिसर 59) मिहिर कोटेचा – मुलुंड 60) अतुल भातखळकर – कांदिवली पूर्व 61) योगेश सागर – चारकोप 62) विनोद शेलार- मालाड पश्चिम 63) विद्या ठाकूर – गोरेगाव 64) अमित साटम – अंधेरी पश्चिम
65) पराग अळवणी – विलेपार्ले 66) राम कदम – घाटकोपर पश्चिम 67) आशिष शेलार – वांद्रे पश्चिम 68) तमिल सेल्वन – सायन कोळीवाडा 69) कालिदास कोळंबकर – वडाळा 70) मंगलप्रभात लोढा – मलबार हिल 71) राहुल नार्वेकर – कुलाबा 72) प्रशांत ठाकूर – पनवेल 73) महेश बाल्दी – उरण 74) राहुल कुल – दौंड 75) शंकर जगताप – चिंचवड 76) महेश लांडगे – भोसरी 77) सिद्धार्थ शिरोळे-शिवाजीनगर 78) चंद्रकांत पाटील – कोथरुड 79) माधुरी मिसाळ – पर्वती 80) राधाकृष्ण विखे पाटील – शिर्डी 81) मोनिका राजळे – शेवगाव 82)शिवाजीराव कर्डिले – राहुरी 83) प्रतिभा पाचपुते – श्रीगोंदा 84) राम शिंदे – कर्जत जामखेड 85) नमिता मुंदडा – केज 86) संभाजी पाटील निलंगेकर – निलंगा 87) अभिमन्यू पवार – औसा 88) राणा जगजितसिंह पाटील – तुळजापूर 89) विजयकुमार देशमुख- सोलापूर शहर उत्तर 90) सचिन कल्याणशेट्टी – अक्कलकोट 91) सुभाष देशमुख – सोलापूर दक्षिण 92) जयकुमार गोरे – माण 93) अतुल भोसले – कराड दक्षिण 94) शिवेंद्रराजे भोसले – सातारा 95) नितेश राणे – कणकवली 96) अमल महाडिक – कोल्हापूर दक्षिण 97) राहुल आवाडे – इचलकरंजी, 98) सुरेश खाडे – मिरज 99) सुधीर गाडगीळ – सांगली

शेलार बंधू रिंगणात
मुंबई भाजपाचे अध्यक्ष अ‍ॅड.आशिष शेलार यांना पुन्हा एकदा वांद्रे पश्चिममधून उमेदवारी जाहीर झाली आहे.आशिष शेलार यांचे मोठे भाऊ असलेले भाजप प्रदेश प्रवक्ते आणि मुंबई भाजपा सचिव विनोद शेलार यांना मालाड पश्चिममधून पहिल्यांदाच उमेदवारी देण्यात आली आहे. विनोद शेलार यांनी 2012 ते 2017 या काळात मुंबईचे नगरसेवक पद भूषवले आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे अस्लम शेख हे विद्यमान आमदार आहेत.

काँग्रेसची बैठक पुढे ढकलली
भाजपापाठोपाठ काँग्रेसची यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता होती. परंतु आज दिल्लीत होणारी काँग्रेसची निवडणूक समितीची बैठक पुढे ढकलण्यात आली. उद्या महाराष्ट्र आणि झारखंडबाबत एकत्र बैठक होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top