लखनौ – उत्तर प्रदेशातील 9 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यात प्रचाराला जोर आला आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पिछेहाटीमुळे भाजपाने आक्रमक प्रचाराचे धोरण आखले आहे. भारतीय जनता पार्टीचे योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ असा इशारा देत या वाक्याची होर्डिंग सगळीकडे लावली आहेत. त्याला समाजवादी पक्षाने आता ‘जुडेंगे तो जीतेंगे’ असे उत्तर देत बॅनरबाजी केली आहे. याआधी समाजवादी पार्टीने ‘27 के सत्ताधीश’ असे बॅनर लावले होते.
भारतीय जनता पार्टी तर्फे हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्यात येत आहे. अयोध्येतील दिवाळीच्या कार्यक्रमातील योगी आदित्यनाथांचे भाषणही प्रचाराप्रमाणेच होते. भाजपा हिंदूंचा तारणहार म्हणून प्रस्थापित केला जात आहे. भाजपाच्या या धार्मिक प्रचाराला समाजवादी पार्टीने उत्तर देत राजधानी लखनौ येथील राजभवन ते समाजवादी पक्षाच्या कार्यालयाकडे जाणार्या मार्गावर तसेच देवरियामध्ये ‘जुडेंगे तो जीतेंगे’ असे होर्डिंग लावले आहेत. समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते व पक्षाचे सचिव विजय प्रताप यादव यांच्या कल्पनेतून व पुढाकाराने हे होर्डिंग लावण्यात आले आहेत. या होर्डिंगवर फक्त समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे छायाचित्र आहे. लखनौ बरोबरच पूर्वांचलच्या गोरखपूरच्या पट्ट्यातही हे होर्डिंग लावले आहेत. भाजपा आणि समाजवादी पक्षात हे बॅनरयुध्द सुरू असताना राज्यातील तिसरी महत्त्वाच्या निषाद पक्षाने अध्यक्ष संजय निषाद यांनाच 27 सालातील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे आणले आहे. काँग्रेसने या निवडणुकीत समाजवादी पार्टीला सहाय्य करण्याची रणनिती आखली आहे. उत्तर प्रदेशात सीसामऊ, कटेहरी, करहल, कुंदरकी, फूलपूर, गाजियाबाद, मझवां, खैर व मिरापूर या 9 जागांवर पोटनिवडणूक होत आहे. दोन्ही पक्षांकडे यातील चार चार जागा असून, मिरापूरची जागा लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय चार जागा या समाजवादी पार्टीकडे होत्या तर 4 मतदारसंघ भाजपाकडे होते.