हिंगोली- भाजपाचे माजी खासदार शिवाजी माने यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत आज पुणे येथे संभाजीराजे यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षात प्रवेश केला. हिंगोली जिल्ह्यातील बंधार्यांच्या प्रश्नावर विधानसभेत पोहोचण्यासाठी मी हा पक्ष प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.
हिंगोली लोकसभेचे माजी खासदार शिवाजी माने शिवसेनेच्या तिकिटावर दोन वेळा लोकसभेत पोहोचले होते. मात्र त्यानंतर त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र काँग्रेसमध्ये ते जास्त काळ रमले नाही. त्यानंतर पुन्हा भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी हिंगोली जिल्ह्याच्या सिंचनाच्या प्रश्नावर रान उठवले होते. सिंचनाच्या प्रश्नावर वेळोवेळी शासनाकडून आश्वासने दिली जात असल्याने माने काही दिवसांपासून नाराज झाले होते. आज पुण्यात संभाजीराजेंच्या उपस्थितीत त्यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षात प्रवेश घेतला. यावेळी बोलताना माने म्हणाले की, जिल्ह्यातील बंधार्यांच्या प्रश्नावर ठाकरे सरकार तसेच शिंदे सरकारने आश्वासनाशिवाय काहीच दिले नाही. कयाधू नदीचे पाणी ईसापूर धरणामध्ये वळवून नांदेडकडे नेले जात आहे, मात्र या प्रश्नावर एकही लोकप्रतिनिधी बोलण्यास तयार नाही. त्यामुळेच आपण विधानसभेत जाऊन हा प्रश्न मांडण्याचा निर्णय घेतला आहे.