मुंबई -भाजपाने विधानसभा निवडणुकीतही लोकसभा निवडणुकीप्रमाणेच प्रचाराचा जोरदार धुरळा उडवण्याचे ठरवले आहे. यासाठी भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या 100 हून अधिक सभांचे नियोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या 8 सभा होणार आहेत, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 20 सभांना संबोधित करणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही 15 सभा होणार आहेत. याशिवाय देवेंद्र फडणवीस यांच्या 50, नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रत्येकी 40 सभांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, प्रचार संपायला जेमतेम 18 दिवसही उरले नसल्याने या सभा घेताना नेत्यांची चांगलीच दमछाक होणार आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाने महाराष्ट्रात सभांचा धडाका उडवला होता. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रात 18 सभा आणि काही रोड शोही केले होते. लोकसभा निवडणुका महाराष्ट्रात पाच टप्प्यांत झाल्या होत्या. विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार आहे. त्यामुळे कमी दिवस असल्याने मोदींच्या 8 सभांची आखणी करण्यात आली आहे.पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मुंबई-कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात त्यांच्या सभा होणार आहेत. 12 नोव्हेंबरपासून या सभा होणार आहेत. 12 नोव्हेंबरला पुण्यात मोदींची एस.पी. कॉलेज मैदान येथे सभा होणार आहे. त्यानंतर त्यांचा तीन दिवस महाराष्ट्रातच मुक्काम असणार आहे. मोदी यांची शेवटची सभा मुंबईत होणार आहे. मोदी यांच्या या सभा फक्त भाजपाच नाही, तर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठीही सभा घेणार असल्याचे सांगितले जात आहे. या सर्व सभांची जबाबदारी देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
मोदी यांच्यापेक्षा दुप्पट सभा गृहमंत्री अमित शहांच्या होणार आहेत. अमित शहा हे राज्यात 20 सभा घेणार आहेत. या सभा राज्यातील महत्त्वाच्या मतदारसंघांत होणार आहेत. या सभांची तारीख अद्याप कळलेली नसली तरी दिवाळीनंतर भाजपाकडून प्रचाराचा नारळ फोडला जाणार असल्याचे बोलले जात आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्या लोकप्रियतेचा फायदा उठवण्याचेही भाजपाने ठरवले असून राज्यात त्यांच्या 15 सभांचे आयोजन करण्यात आले आहे. योगींव्यतिरिक्त गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांच्याही सभा होणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 40 सभा घेणार आहेत. केंद्रीय पातळीवरील नेत्यांव्यतिरिक्त राज्यातील नेत्यांवरही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वाधिक 50 आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 40 सभा घेणार आहेत.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार 18 नोव्हेंबरला प्रचार संपणार आहे. त्यात दिवाळीचा सण आल्याने पाच दिवस प्रचारसभा होणार नाहीत. त्यामुळे सभांसाठी 15 दिवसांचा अवधी मिळणार आहे. एवढ्या कमी काळात इतक्या सभांचे नियोजन केले असल्याने दिवसाला तीन-तीन सभाही घ्याव्या लागणार आहेत. ते शारीरिकदृष्ट्याही थकवणारे किंबहुना अशक्यही असेल.
भाजपाचा 15 दिवसांत प्रचारसभांचा धडाका मोदी 8, शहा 20, फडणवीस 50 सभा घेणार
