मुंबई – उद्धव ठाकरेंनी राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी तसेच आमदार, खासदारांची महत्त्वाची बैठक आज उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी घेतली. यावेळी कर्नाटक निवडणुकीत भाजपला कर्नाटकातून घालवले, आता महाराष्ट्रातूनही घालवू असा विश्वास उद्धव ठाकरेंनी आमदारांना दिला.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उद्धवसेनेत आणखी फाटाफूट होण्याची चर्चा सुरू झाली आहे. काही जण आमच्या संपर्कात असल्याचा दावाही शिंदेसेनेकडून होत आहे. भाजपच्या गोटातूनही उद्धवसेनेतून काही आमदार बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत, असे म्हटले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत सुप्रीम कोर्टाच्या निकालावर विस्तृत चर्चा झाली.
या बैठकीत सुप्रीम कोर्टाच्या सत्तासंघर्षावरील निकालाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आमदारांना निर्णयाबाबत समजावून सांगण्यात आले. पुढील आठवड्यात महाराष्ट्रातील जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावण्यात आली आहे. जिल्हाप्रमुखांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.