भांडू नका! नाहीतर कानाखाली आवाज

पुणे – विरोधी पक्षनेते अजित पवार नेहमी बिनधास्त बोलत असतात. आपल्या कार्यकर्त्यांना ते वारंवार सुनावत असतात. नुकत्याच पुण्यात झालेल्या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना सणसणीत दमच भरला. मुळशीतील पदाधिकार्‍यांना उद्देशून त्यांनी म्हटले की, तुम्हाला पदे दिली आहेत. भांडू नका. नाहीतर एकेकाच्या कानाखाली आवाज काढेन आणि पदे काढून घेईन.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठका सुरू आहेत. महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघांचा आढावा या बैठकांतून घेतला जाणार आहे. या बैठकांना या मतदारसंघातील पक्षाचे आजी-माजी आमदार, खासदार, पक्षाचे पदाधिकारी आणि इच्छूक यांची उपस्थिती असते. पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालय आढावा बैठकीनंतर पक्षाच्या 9 जूनला होणार्‍या वर्धापन दिनानिमित्ताने अजित पवारांनी पदाधिकार्‍यांशी संवाद साधला. या बैठकीत ते म्हणाले की, पुण्यातून भरपूर वाहने निघाली पाहिजेत. 1,000 चारचाकी वाहने ग्रामीण भागातून आली पाहिजे. शहरी भागातूनही तेवढी वाहने काढू शकतो. तेवढी आपली ताकद निश्चित आहे. हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला या मतदारसंघात आपली ताकद आहे. आजची बैठक संपल्यानंतर उद्या, परवा मुंबईत असणार आहे. तोपर्यंत तुम्ही तयारी करा आणि मला दाखवा. मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरही बोलू शकेन. यानंतर कार्यकर्त्यांना पक्षासाठी झोकून काम करायला सांगत ते म्हणाले, राष्ट्रवादीचे 24 वे वर्षे पूर्ण होऊन आपण 25 व्या वर्षात प्रवेश करत आहोत. तुम्ही सगळ्यांनी याचा विचार करायचा आहे. आपल्यावर खूप मोठी मदार आहे. महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभा मुंबई, नागपूरमध्ये घेण्यात आल्या. तिथे मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले होते. मुळशीच्या लोकांनीही असेच काम करायचे आहे. नाहीतर एकेकाच्या कानाखालीच आवाज काढेन. बाकी काही नाही. तुमची बदनामी होत नाही. बदनामी आमची होते. शरद पवारांची बदनामी होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top