मुंबई- दरवर्षी पावसाळा सुरू झाला की अंधेरी येथील सब वे बंद करण्याची वेळ प्रशासनावर येते. मात्र यंदा भरपावसातही अंधेरीचा सब वे खुला राहणार आहे. एक नवीन नाला बांधला जाणार असल्याने हे शक्य होणार आहे.
पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा म्हणून मोगरा नाल्याशेजारी आणखी एक नाला बांधला जाणार आहे. त्यामुळे अंधेरी सब वे मध्ये पावसाचे पाणीच साचणार नाही.अंधेरी सब वे म्हणजेच अंधेरी भुयारी मार्ग हा मुंबईतील अतिसखल परिसरापैकी एक आहे. मोगरा नाल्याच्या सुरुवातीपासून अंधेरी सब वेपर्यंत अडीच किलोमीटर लांबीचा नाला वाहतो. या नाल्याचा प्रवाह तब्बल १३ मीटर उताराचा आहे. जोरात पाऊस कोसळला की सब वे जलमय होतो. पण आता नवीन नाला बांधला जाणार आहे. त्यासाठी पालिका प्रशासन लवकरच निविदा मागविणार आहे.