पालघर- जव्हार तालुक्यात मागील सात दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.या पावसामुळे तालुक्यातील झाप मार्ग ते मांगेलवाडा पासून चोथ्याची वाडीपर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.त्यातच पोंढीचा पाडा गावाजवळ असलेल्या पुलाला साधारण साडेतीन फूट व्यासाचे भगदाड पडले असून त्यामुळे अनेक गावपाड्यांचा संपर्क तुटला आहे.तसेच याठिकाणी अपघाताची शक्यता वाढली आहे.
गेल्या वर्षभरापासून एस आकाराच्या वळणात रस्ता खचला आहे, परंतु त्यावर अद्याप कोणतीही उपाय योजना करण्यात आलेली नाही.याठिकाणी संरक्षण भिंत उभारणे गरजेचे असून तसे केले नाही तर रस्ता खचून या भागातील वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे. पौढीचा पाडा पुलावर मोठे भगदाड पडले असताना कालपासून या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी जात आहे.त्यामुळे या भागातील रस्ता बंद झाला आहे. परिणामी या भागातील ५ ग्रामपंचायत,१ प्राथमिक आरोग्य केंद्र,८ पथके,२ आश्रम शाळा,३५ जिल्हा परिषद शाळेचे मार्ग बंद झाले आहेत.