सातारा – पंजाबमधील भटिंडा येथील सैन्यदलाच्या तळावर बुधवारी गोळीबार झाला. या हल्ल्यात चार जवानांचा मृत्यू झाला. यामध्ये साताऱ्यातील करंदोशी येथील एका जवानाचा समावेश आहे. जवान तेजस मानकर (२२) असे या जवानांचे नाव आहे. सैन्य दलातील अधिकारी मेजर भट्टाचार्य यांनी जावळीचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांना ई-मेल करून तेजस यांचे पार्थिव शनिवारी संध्याकाळी किंवा रविवारी गावी आणण्यात येईल, असे सांगितले आहे.
पंजाबमधील भटिंडा मिलिट्री स्टेशनमध्ये गोळीबार झाला. हा दहशतवादी हल्ला नसल्याचे स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासात स्पष्ट केले. परस्परांमधील मतभेदातून ही घटना घडल्याचा पंजाब पोलिसांना संशय असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. यावेळी सेवा बजावत असताना तेजस यांच्या डोक्याला गोळी लागली. त्यांना उपचारासाठी मिलिटरी रुग्णालयात त्वरित दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या तरुण जवानाच्या निधनाची बातमी समजताच जिल्ह्यासह संपूर्ण जावळी तालुक्यावर शोककळा पसरली.
तेजस दोन वर्षापूर्वी सैन्य दलात दाखल झाले होते. त्यांचे वडील सैन्यदलात मेजर पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. भाऊ सैन्यदलात कर्नल पदावर कार्यरत आहे. तसेच त्यांचे काका शशिकांत मानकर हेसुद्धा सैन्यदलात सेवा बजावत आहेत. सैन्यदलात कर्तव्य बजावण्याची परंपरा असलेल्या मानकर कुटुंबातील तेजस दोन वर्षापूर्वी सैन्यात दाखल झाले होते.