रांची- रांचीत सोमवारी झालेल्या अपघातात आदिवासी नेता भगवान बिरसा मुंडा यांचे वंशज मंगल मुंडा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. काल रात्री त्यांनी रांचीच्या राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी मुख्यमंत्री हेमंत सोरेन रुग्णालयात पोहोचले आणि अंत्यदर्शन घेत त्यांच्या मृत्यूबाबत दु:ख व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक्सवर पोस्ट करुन त्यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केले.
२५ नोव्हेंबरला टेम्पोच्या छतावर बसून मंगल मुंडा मित्रासह खुंटीहून तामरकडे जात होते. सायको पोलीस स्टेशन हद्दीतील वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो उलटली. त्यात मंगल मुंडा यांच्या डोक्याला गंभीर मारा बसला. त्यांच्या मित्राला किरकोळ दुखापत झाली. समाजसेवक बिनसे मुंडा काही लोकांसह खुंटी येथे जात असताना त्यांना अपघात झाल्याचे दिसले. त्यांनी जखमींना रुग्णालयात नेऊन पोलिसांना माहिती दिली. अपघाताच्या दुसऱ्या दिवशी मंगल मुंडा हे भगवान बिरसा मुंडा यांचे वंशज असल्याचे उघड झाले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार उपचार सुरू झाले.मंगळवारी डॉ. उपाध्याय यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर रांचीच्या राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये उपचार सुरू होते. ऑपरेशननंतर मंगल मुंडा व्हेंटिलेटरवर होते. मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि त्यांच्या आमदार पत्नी कल्पना सोरेन यांनी रुग्णालयात भेट देऊन मंगल मुंडा यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. विशेष म्हणजे बिरसा मुंडा यांना देव मानणाऱ्या या राज्यात त्यांच्या वंशजांची परिस्थिती काय आहे हेही सरकारला माहित नसावे ही वेदनादायी बाब आहे .