भंडारा – शहरातील बीएसएनएलच्या दुमजली प्रशासकीय इमारतीला रविवारी पहाटे ५ च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत कार्यालय कार्यालयीन कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
शहरातील जिल्हा कारागृहाच्या मागे असलेल्या बीएसएनएलच्या दुमजली कार्यालयाच्या एका खोलीतून आज पहाटे ५ वाजताच्या सुमारास धूर निघत असल्याचे सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आले. याची माहिती अधिकाऱ्यांना दिल्यांनतर ताबडतोब अग्निशमन दल, नगर परिषद मुख्याधिकारी जाधव व पोलीस विभागातील अधिकारी घटनास्थळी पोहोचले. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.